कोलकाता : भाजप कार्यकर्त्यांच्या ‘जय श्रीराम’च्या घोषणेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसने ‘जय हिंद’ने उत्तर द्यायचे ठरविले आहे. त्याची सुरुवात ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटरवर हँडल व फेसबुकवरील डिस्प्ले प्रोफाईलवरही (डीपी) तो नारा दिला आहे. तृणमूलच्या अनेक नेत्यांनीही लगेच त्यांचे अनुकरण केले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या नव्या डीपीवर जय हिंद, जय बांगला ही घोषणा लिहिली आहे. त्याशिवाय महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय, रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ईश्वरचंद्र विद्यासागर, मातंगिनी हाजरा व काझी नजरुल इस्लाम यांची छायाचित्रेही त्या डीपीमध्ये आहेत.
प्रचाराच्या काळात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोच्या दरम्यान ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी डीपीवर विद्यासागर यांचे छायाचित्र लावले होते. फेसबुकवर ममता बॅनर्जी यांनी जी पोस्ट टाकली आहे, त्यात म्हटले आहे, जय श्रीराम, जय रामजी की, राम नाम सत्य आहे या धार्मिक धारणा आहेत. त्यांचा आपणही आदर करतो; पण राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये.
बंगाली अस्मितेस फुंकर‘जय हिंद’बरोबरच ‘जय बांगला’ ही घोषणा देण्यामागे ममता बॅनर्जी यांचा बंगाली अस्मिता जागवण्याचा हेतू स्पष्टपणे दिसत आहे. हल्ली त्या जिथे जातात, तिथे भाजपचे कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ या घोषणा देतात. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये धर्म व बंगाली अस्मिता यांची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या जय हिंद व जय बांगला या घोषणेला चांगला प्रतिसाद व सोशल मीडियावर प्रचंड लाईक मिळत आहेत.