राहुल यांची टीका भाजपाच्या जिव्हारी, राजनाथ सिंग यांनी दिले प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:03 AM2017-12-18T01:03:03+5:302017-12-18T01:03:30+5:30
देशात विविध प्रश्नांवरून आगी लावण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केला आणि या आगी विझविण्याचे काम फक्त भारतीय जनता पार्टी करीत आहे, असा दावा केला.
बंगळुरु : देशात विविध प्रश्नांवरून आगी लावण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केला आणि या आगी विझविण्याचे काम फक्त भारतीय जनता पार्टी करीत आहे, असा दावा केला.
भाजपा सांप्रदायिक राजकारण करून देशात आगी लावत असल्याचे राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने केलेल्या पहिल्या भाषणात म्हटले होते. ‘भाजपा’ने येथे आयोजित केलेल्या ‘परिवर्तन रॅली’मध्ये त्याला उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, राहुल गांधी यांचे मी अभिनंदन करतो. परंतु त्याच बरोबर मी त्यांना असे विचारू इच्छितो की, देशात सांप्रदायिकता, दहशतवाद व नक्षलवादाच्या आगी भाजपाच्या धोरणांमुळे भडकल्या का? काश्मीर धुमसत आहे तेही भाजपामुळेच? मुळीच नाही. आगी लावून सत्तेवर येण्याचे राजकारण जर कोणी केले असेल तर ते काँग्रेसने केले, भाजपाने त्या आगी विझविण्याचेच काम केले आहे.
देशात घराणेशाहीचे बिजही काँग्रेसनेच पेरले, असाही त्यांनी आरोप केला. भाजपा सत्तेवर आल्यापासून भारत एक सामार्थ्यशाली देश म्हणून जगात मान्यता पावला आहे, असा दावा करून राजनाथ सिंग म्हणाले की, भारत दुबळा असता तर चीनच्या सिमेवर निर्माण झालेला डोकलामचा तिढा ज्या पद्धतीने सुटला नसता. भारत आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, हे चीननेही मान्य केल्याचे ते म्हणाले.