कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मात्र य़ाच दरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. राजकीय पक्ष यावरून एकमेकांवर यावरून आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भाजपाच्या महिला उमेदवारावर विषारी रंग फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिला उमेदवार गंभीररित्या जखमी झाली आहे. मिळालेल्य़ा माहितीनुसार, चुचुरा विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार लॉकेट चॅटर्जी (Locket Chatterjee ) यांच्यावर रसायन मिश्रित रंग फेकण्यात आला आहे.
विषारी रंगाचे काही थेंब चॅटर्जी यांच्या डोळ्यात गेले. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. यावरून भाजपाच्या महिला उमेदवाराने तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. "आपल्यावर विषारी रसायन मिश्रित रंग फेकण्यात आला. हा रंग कोणी फेकला हे पाहिल्यावर टीएमसीचे काही कार्यकर्ते दिसून आले. त्यांनी हा रंग फेकला" असं लॉकेट बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
होळी समारंभात संतापले बाबुल सुप्रियो; भाजपा कार्यकर्त्याच्या लगावली थोबाडीत, Video व्हायरल
एका होळी समारंभात भाजपा खासदार बाबुल सुप्रियो (BJP MP Babul Supriyo) संतापलेले पाहायला मिळाले. रागाच्या भरात त्यांनी सर्वांसमोर एका कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबुल सुप्रियो आणि एका तरुण कार्यकर्त्यात बोलताना काहीसा वाद झाला आणि यानंतर सुप्रियो यांनी कोणताही विचार न करता थेट या कार्यकर्त्याच्या थोबाडीत मारली.
पीडित तरुणाने खासदार सुप्रियो यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉलीगंज येथे रविवारी (28 मार्च) दुपारी 12 वाजता होळी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाची देखील तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमाला भाजपाचे खासदार बाबुल सुप्रियो 12 वाजता येणार होते. मात्र त्यांना काही कारणांमुळे कार्यक्रम स्थळी येण्यासाठी दुपारचे अडीच वाजले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागतही केलं. यावेळी तेथे माध्यम प्रतिनिधीही उपस्थित होते.