कोलकाता - भाजपाची विजयी घोडदौड सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या चांगल्या यशानंतर नगरपालिका निवडणुकीतही भाजपने तृणमुल काँग्रेसला भुईसपाट केले आहे. येथील भाटपारा येथे झालेल्या निवडणुकीत भाजपने 26 पैकी 26 जागा जिंकल्या आहेत. तृणमुल काँग्रेसला एकही जागा मिळाली नसल्याने येथे पुन्हा एकदा भाजपाची लाट दिसली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाटपारा नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि तृणमुलसाठी प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत तृणमुलला पराभवाचा मोठा धक्का दिला. आतापर्यंत भाजपने पश्चिम बंगालमध्ये एकही नगरपालिकेवर झेंडा फडकवला नव्हता. पहिल्यांदाच भाजपची नगर पालिकेवर सत्ता आली आहे. भाटपारा विधानसभा निवडणुकीतही भाजपचा विजय झाला होता. बैरकपूर मतदारसंघातून भाजपचे अर्जुन सिंह निवडून आले. तृणमूल सोडून भाजपमध्ये आलेल्या सिंह यांनी 3 वेळा खासदार असलेल्या दिनेश त्रिवेदी यांचा पराभव केली होता.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 42 पैकी 18 जागांवर विजय मिळाला आहे. 2014 मध्ये फक्त 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.