नवी दिल्ली: आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्पपत्र’ असे दिले आहे. नवी दिल्लीतील भाजपा कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत.
भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. यासाठी देशभरातून जवळपास 7500 सूचना पेट्या, 300 रथ आणि इलेक्ट्रानिक माध्यमांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार भाजपाने हा जाहीरनामा तयार केला आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकरी आणि तरुण वर्गासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच या संकल्पपत्रात रोजगार निर्मितीबाबत पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या 2 एप्रिल रोजी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली आहे.
फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणागेल्या लोकसभा निवडणुकीतील अब की बार मोदी सरकार ही भाजपाची घोषणा अतिशय गाजली होती. आता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने नवी घोषणा दिली आहे. फिर एक बार, मोदी सरकार, असे म्हणत यंदा भाजपाकडून पुन्हा एकदा मोदींच्या हाती सत्ता देण्याचं आवाहन करण्यात येणार आहे.
अब होगा न्याय! लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची टॅगलाईनकाँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्याय योजनेला केंद्रस्थानी ठेवत 'अब होगा न्याय' घोषणा दिली आहे. किमान उत्पन्न योजनाच काँग्रेसच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल, हे या घोषणेतून काँग्रेसने अधोरेखित केले आहे. 25 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी न्याय योजनेची घोषणा केली होती. यानंतर गेल्याच आठवड्यात राहुल गांधींनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यातही न्याय योजनेवरच भर देण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना न्याय देण्यात येईल, असे राहुल गांधींनी म्हटले होते.