मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुंबई, महाराष्ट्रातील विकास रखडला होता. प्रकल्पांची कामे बंद होती. मात्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर या विकासकामांना, प्रकल्पांना वेग मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.
कांदिवली येथील पन्नाप्रमुखांच्या मार्गदर्शन शिबिरात ते म्हणाले, विरोधी पक्षात कोणाकडे नेता आहे, तर नीती नाही. नीती आहे तर नियत नाही. नियत आहे; पण नेता नाही. काहींकडे तर कार्यकर्तेच नाहीत.
अन्य पक्ष कुटुंबाचे भाजपमध्ये साधा कार्यकर्तादेखील पंतप्रधानपदावर विराजमान होऊ शकतो. इतर पक्ष हे कौटुंबिक आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे असतील वा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस असेल हे कौटुंबिक पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली. मायावती, अखिलेश यादव यांचे पक्ष बघा सगळे कौटुंबिक पक्ष आहेत. वडील, मुलगा, जावई, मुलगी हेच चालू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.