- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : यंदा डिसेंबरच्या प्रारंभी तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप हायकमांडने आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या रणनीतीचा एक भाग म्हणून केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि पूर्वोत्तर विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह चारही लोकसभा खासदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतील तेलंगणातील एकमेव भाजप खासदारालाही अनौपचारिकपणे विधानसभा लढविण्याबाबत सांगण्यात आले आहे.
भाजपने आपले प्रमुख रणनीतीकार सुनील बन्सल यांना गेल्या वर्षी यूपीमधून तेलंगणामध्ये पाठविले. तसेच त्यांना तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालचे सरचिटणीस प्रभारी म्हणून बढती दिली. भाजपने तेलंगणाचे भाजपचे सरचिटणीस प्रभारी तरुण चुग यांनाही तेथे तैनात केले आहे. विशेष म्हणजे तेलंगणात भाजपने विजय मिळविल्यास मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत जी. किशन रेड्डी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार हेदेखील पुढे राहतील. ते लोकसभेचे सदस्य आहेत आणि २०२० पासून प्रदेशाध्यक्ष आहेत.
भाजपची आशा वाढलीमुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्येसह भारतीय राष्ट्र समितीच्या नेत्यांवर दारू-गेट घोटाळ्यात खटले दाखल झाल्याने राज्यात भाजपच्या आशा वाढल्या आहेत. पक्षाला २०१८ च्या निवडणुकीत फक्त ७.१ टक्के मते आणि विधानसभेची एक जागा मिळाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला सुमारे २० टक्के मते मिळाली होती. त्यावेळी भाजपने लोकसभेच्या चार जागा जिंकल्या होत्या.