नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या तोडीचा कोणी नेता नसल्याने, निराश झालेल्या विरोधी पक्षांनी ‘मोदी हटाव’ची नकारात्मक घोषणा देत, अमंगळ आघाडीचे केविलवाणे प्रयत्न सुरू केले आहेत, अशी टीका करत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने आगामी लोकसभा निवडणूक आणखी भक्कम बहुमताने जिंकण्याचा ‘मिशन २०१९’चा रोडमॅप रविवारी मंजूर केला. त्याचसोबत मोदींचे ‘न्यू इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाने ‘व्हिजन २०२२’लाही मंजुरी दिली. मोदी यांनी ‘अजेय भारत, अटल भारत’चा नारा दिला.राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकाऱ्यांची, तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी झालेल्या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. विरोधकांजवळ ना कोणी नेता आहे, ना नीती ना रणनीती आहे, त्यामुळे हताश मन:स्थितीत ते नकारात्मक राजकारण करीत आहेत, असे प्रतिपादन जावडेकर यांनी केले.पक्षाने अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या मुद्द्याचा साधा उल्लेखही न करून जाणीवपूर्वक बगल दिली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, अशी पक्षाची अधिकृत भूमिका असली, तरी विश्व हिंदू परिषद, रा.स्व.संघ, हिंदू संत संमेलनासह भाजपच्या काही नेत्यांनी या मुद्याचा जोरदार पाठपुरावा चालवला आहे. प्रकाश जावडेकरांनी पत्रकार परिषदेत राम मंदिराबाबत प्रश्नांची उत्तरे देण्याचे सपशेल टाळले. बैठकीत राम मंदिराचा विषय आज चर्चेत नव्हता, असा ओझरता उल्लेख त्यांनी केला. विषय बदलतांना जावडेकर म्हणाले, पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कुशल नेतृत्वामुळेच देशात आज भाजपचे ३५0 पेक्षा जास्त खासदार व १५00 पेक्षाही अधिक आमदार आहेत. १९ राज्यात भाजपचे सरकार आहे. बहुधा राम मंदिराची कास न धरताही पक्ष घोडदौड करू शकतो, असेच त्यांना सुचवायचे असावे. पक्षाध्यक्ष अमित शहांनी २0१९ ची निवडणूक सहजपणे कशी जिंकता येईल याचा फॉर्म्युला बैठकीत सादर केला.
>मोदी यांचा नवा नारा : अजेय भारत, अटल भाजपापंतप्रधान मोदी यांनी बैठकीत पक्षाला ‘अजेय भारत, अटल भाजपा’ अशी नवी घोषणा देत, आगामी लोकसभा निवडणुकीचे जणू बिगुल फुंकले. सत्ताधारी म्हणून अपयशी ठरली, काँग्रेस विरोधी पक्ष म्हणूनही अपयशी ठरल्याची टीका करत, त्यांनी विरोधकांच्या प्रस्तावित महाआघाडीची ‘नेतृत्व का पता नही, नीती अस्पष्ट, नीयत भ्रष्ट,’ अशी संभावना केली.>५० वर्षे सत्तेत राहू : भाजपा आपल्या भक्कम कामगिरीच्या जोरावर सन २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर नक्की येईलच. त्यानंतर, पुढील ५० वर्षे भाजपाला कोणी सत्तेवरून खाली खेचू शकणार नाही, असा विश्वास पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.> राजकीय ठरावात ग्वाहीकेंद्रीय गृृहमंत्री राजनाथसिंह यांनी राजकीय प्रस्ताव मांडला व त्यास हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर व अविनाश गन्ना यांनी अनुमोदन दिले. भारतात सन २0२२ पर्यंत जातीवाद, सांप्रदायिक वाद, दहशतवाद व नक्षलवाद यांचे समूळ उच्चाटन झालेले असेल,अशी ग्वाही राजनाथ सिंग यांनी दिली. प्रस्तावात असेही नमूद करण्यात आले की, २0१४ पासून गेल्या ४ वर्षात देशातल्या १५ राज्यात भाजपने निवडणुका जिंकल्या. आजमितीला २0 राज्यात भाजप व विरोधक अवघ्या १0 राज्यात सत्तेवर आहेत. काँग्रेसचा तर अवघ्या ३ राज्यांपुरता संकोच झाला आहे.>मुस्लिम घुसखोरांना थारा नाहीआसाममधील नॅशनल सिटिजन्स रजिस्टर (एनआरसी)चा उल्लेखही गृहमंत्र्यांनी प्रस्तावात केला. त्यावर बैठकीत व्यापक चर्चाही झाली. बांगला देशी व रोहिंग्या मुस्लिमांसारख्या घुसखोरांसाठी भारतात जागा नाही मात्र अफगाणिस्तान, बांगला देश व पाकिस्तानातून जर शीख बौध्द, ख्रिश्चन, जैन व हिंदू निर्वासित भारतात आले तर त्यांची सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यात नमूद केले गेले.>थोड्या त्रासानंतर घोडदौडकार्यकारिणीने मंजूर केलेल्या आर्थिक प्रस्तावात असे नमूद करण्यात आले की ४ वर्षांपूर्वी एक कमजोर, अपारदर्शी, व पूर्णत: भांडवलशाही अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या हाती आली. आमच्या सरकारने त्यात मूलभूत सुधारणा घडवल्या. नोटबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेचा अभूतपूर्व कायापालट झाला. हे बदल घडवतांना जनतेला त्रास जरूर झाला मात्र आता अर्थव्यवस्थेची वेगाने घोडदौड सुरू झाली आहे.