नवी दिल्ली - बिहार विधानसभेची यंदाची निवडणूक ही दुरंगी न राहता बहुरंगी बनली आहे. २०१५ च्या आधी लहान पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत होते; पण यंदासारखे त्यांचे तगडे आव्हान कधी पाहण्यास मिळाले नव्हते. यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांत तुल्यबळ उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होत आहेत. त्यामुळे, भाजपानेही यंदाची निवडणूक अतिशय मनावर घेतल्याचं दिसून येतंय, कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये तब्बल 12 सभा घेणार असल्याची माहिती बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजपाने बिहार निवडणुकीत जयदू (यु)सोबत आघाडी केली आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक रंगतदार होणार आहे. सत्ताधारी पक्षाचे नितीशकुमार हेच रालाओकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. तर, काँग्रेस आणि राजद यांच्यासह मित्रपक्षातील आघाडीतही तगडे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे, भाजपाने यंदाच्या निडणुकीत पंतप्रधान मोदींच्या तब्बल 12 सभा बिहारमध्ये लावल्या आहेत. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकांचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली.
राज्यातील सासाराम येथे २३ ॲाक्टोबर रोजी मोदींची पहिली सभा होणार असून त्याचदिवशी गया आणि भागलपूर येथेही सभा होणार आहेत. म्हणजे प्रत्येक दिवशी तीन सभा, असं नियोजन भाजपाकडून आखण्यात आलं आहे. त्यानंतर, २८ ॲाक्टोबर रोजी दरभंगा, मुझफ्फरपूर, पाटणा येथे दुसऱ्या दौऱ्यात सभा होतील. तर, १ नोव्हेंबर रोजी छपरा, पूर्व चंपारण आणि समस्तीपूर येथे मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी पश्चिम चंपारण, सहरसा आणि फारबीसगंज येथे मोदींच्या सभा होतील. फारबीसगंज येथील अखेरच्या सभेतून प्रचाराची सांगता होणार आहे.
बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत
यंदाच्या निवडणुकीत मात्र प्रत्येक मतदारसंघानुसार गणित बदललेले आहे. भाजप, जनता दलाची (यु) रालोआ कागदावर वरचढ दिसत असली तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र त्यांच्या उमेदवारांना राजद-काँग्रेस महागठबंधनसह जीडीएसएफ (उपेंद्रसिंह कुशवाह), एलजेपी, पीडीए (पप्पू यादव), एलजेपी (चिराग पासवान) या पक्षांच्या उमेदवारांचे कडवे आव्हान आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) प्रमुख रामविलास पासवान यांचे झालेले निधन व पासी समाजाकडून मिळत असलेले समर्थन, निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अनेक नेत्यांनी केलेला पक्ष प्रवेश, केंद्रात मोदी; पण बिहारमध्ये नितीशऐवजी कोणी, अशा भूमिकेमुळे एलजेपी यावेळी गेमचेंजरच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचप्रमाणे जीडीएसएफदेखील धक्कादायक निकाल देण्याच्या परिस्थितीत दिसते. पप्पू यादव यांच्या पीडीए आघाडीच्या उमेदवारांसह डाव्या पक्षांनीदेखील तगडे आव्हान निर्माण केले आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती, सरकारविरोधी भावना अन् सक्षम विरोधी पक्षाच्या अभावामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुरंगी साठमारीत कोण कोणाला हरवणार व कोण कोणाला जिंकण्यासाठी मदत करणार, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. प्रत्येक पक्ष आपले जास्तीत जास्त उमेदवार आणून निकालानंतरच्या राजकारणात गुंतलेला दिसत आहे.