नवी दिल्ली - महात्मा गांधी यांच्याबाबत माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद लोकसभेत उमटले. या विधानावर आक्षेप घेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भाजपा नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.
लोकसभेचं कामकाज सुरु होताच काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी हेगडे यांच्या विधानाचा संदर्भ घेत भाजपावर आक्षेपार्ह विधान केले. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, लोकसभेत सीएए आणि एनआरसीबाबत शांततेत निदर्शने होत आहेत. आम्ही महात्मा गांधींच्या आदर्शांचे अनुसरण करून शांततेत निदर्शने करीत आहोत. गांधींच्या आदर्शांवर जगभर चर्चा केली जाते, परंतु आता त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच आज हे लोक महात्मा गांधींना शिव्या देतात, ही रावणांची औलाद आहे ते रामाचे पुजारी असलेल्या गांधींचा अपमान करतात अशी जोरदार प्रहार भाजपावर लगावला. मात्र या विधानावर भाजपा खासदारांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात गदारोळ माजला होता. अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण करणाऱ्या भाजपाविषयी आक्षेपार्ह भाष्य केले. गोंधळाच्या वेळी सभापती म्हणाले की, चौधरी यांचे वक्तव्य कामकाजात समाविष्ट केले जाणार नाही. मात्र गांधींवर केलेल्या टीकेबद्दल माफी मागण्याची मागणी काँग्रेस खासदारांनी लावून धरली होती.
दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा नेते आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कर्नाटक भाजपचे प्रमुख नलिन कुमार कटील यांनी ही माहिती दिली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हेगडे यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतल्याचे ते म्हणाले. हेगडे यांनी वादग्रस्त वक्तव्य करत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. महात्मा गांधी यांनी इंग्रजांसबोत करार केला होता. ज्या स्वतंत्र सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले नाही त्यांनी केवळ सत्यागृह करून स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा दावा केला आहे. त्यावरच ते महापुरुष बनल्याचे हेगडे यांनी म्हटले होते. बंगळुरू येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हेगडेंना भाजप नेतृत्वाकडून नोटीस
हिंसाचार पसरवण्यासाठी मिळाला होता पैसा?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे उघड
शाहीन बागेत थंडीमुळे चिमुकल्याचा मृत्यू; आई-वडील अजुनही आंदोलनावर ठाम
कुणाल कामरा पुन्हा चर्चेत, 'लाच' देण्यासाठी पोहोचला राज ठाकरेंच्या घरी...