रघुनाथ पांडे, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याची फलनिष्पत्ती अधिकृतपणे सांगण्यासाठी बोलविण्यात आलेल्या भाजपा खासदारांच्या बैठकीला महाराष्ट्रातील २३ पैकी २० खासदारांनी ‘खो’ दिला. स्वत: संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनाही या गैरहजरीमुळे धक्का बसला. सूत्राने सांगितले, की नायडू यांनी बैठकीनंतर ही बाब पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातली.प्रथम ब्राझिल व नंतर जपानला गेलेल्या पंतप्रधानांनी त्या भेटींमध्ये देशासाठी काय केले, याबाबतचा सविस्तर तपशील देण्यासाठी पंतप्रधानांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता संसदेच्या एका सभागृहात देशातील खासदारांची तातडीची बैठक बोलविली होती. त्याबाबतचे निमंत्रण सर्वच खासदारांना सोमवारी देण्यात आले. अनेकांनी होकार कळविले, प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रातील २३ पैकी मुंबईतून गोपाळ शेट्टी, लातूरहून सुनील गायकवाड व अहमदनगरहून दिलीप गांधी हेच पोहोचले. खा. तरूण विजय हे या बैठकीचे संयोजक होते. तर व्यंकय्या नायडू हे खासदारांनी माहिती देतील असे स्वत: पंतप्रधान मोदी यांनी ठरविले होते.खासदारांशी याविषयी संवाद साधून त्यांची मते घेण्याचीही सूचना मोदींनी दिली होती. त्यानुसार बैठकीनंतर अर्धा तास संवाद झाला.जगप्रसिध्द अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांचा विकास जपान सरकार करणार असल्याचे यावेळी खासदारांना सांगण्यात आले. येण्याचे कबूल केलेल्या अनेक खासदारांनी अडचणींचा पाढा वाचला. काहींनी गणेशात्सवाची सांगता मिरवणूक, अनेकांनी निवडणुकीच्या नियोजनाबाबत कळविले तर काहींनी निरोप वेळेवर मिळाल्याने वेगळी कारणेही दिली. मंत्र्याना या बैठकीतून सूट देण्यात आली होती, पण बैठक सुरू झाल्यावर स्मृती इराणी, उमा भारती व अनंतकुमार हे मंत्री पोहोचले. उत्तरप्रदेश, गुजरात व कर्नाटकातील खासदारांची शंभरटक्के उपस्थिती होती. खा. गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला सांगितले, निरोप सोमवारी दुपारी मिळाल्याने अनेकांनी येणे शक्य झाले नसावे.
मोदींच्या आमंत्रणाला भाजपा खासदारांचा ‘खो’!
By admin | Published: September 10, 2014 3:07 AM