नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते कार्यकारी अध्यक्ष असा प्रवास करणारे जेपी नड्डा यांच्यावर पक्षाच्या वतीने तीन राज्यातील निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या तीन राज्यातील निवडणुकींची जबाबदारी ते अमित शाह यांच्यासोबत मिळून पार पाडणार आहे.
तीन राज्यातील निवडणुकीच्या काळात नड्डा यांच्या क्षमतांची चांगलीच कसोटी लागणार आहे. भाजपमध्ये प्रथमच राष्ट्रीय अध्यक्षांसोबत कार्यकारी अध्यक्ष असणार आहे. तीन राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर जेपी नड्डा यांची अध्यक्षपदासाठीची दावेदारी आणखी मजबूत होणार आहे. पक्षाध्यक्षपदी एखाद्या नेत्याला नियुक्त करण्याचा पर्याय मोदींसमोर होता. मात्र त्यासाठी राष्ट्रीय परिषदेची मोहर लागणे आवश्यक होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे शाह यांचा कार्यकाळ संपला असून नवीन अध्यक्ष निवड होणार आहे. या दुविधेतून मुक्तता मिळविण्यासाठी पक्ष संघटनेने निवडणुकीच्या निकालावरूनच अध्यक्ष निवडीची निर्णय घेतल्याचे दिसून येते.
पक्ष संघटनेकडून नड्डा यांनाच पसंती मिळण्याचे संकेत आहेत. मात्र त्यांची खरी परीक्षा तीन राज्यांच्या निवडणुकीत लागणार आहे. त्यातच नड्डा यांना संघटन वाढविण्याचा व्यापक अनुभव आहे. तसेच अमित शाह देखील त्यांच्या मदतीला असणार आहे. त्यामुळे नड्डा यांना फारशी अडचण होणार नाही, अशी शक्यता आहे.