अहमदाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात भाजपा संसदीय मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये राज्यांतील २५ जागांसाठीच्या भाजपा उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. ही यादी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला पाठविण्यात येणार असून, त्यामधून अंतिम उमेदवार निवडले जाणार आहेत. गुजरात भाजपा संसदीय मंडळाची तीन दिवस सलग बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सर्व २६ लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांबाबत चर्चा झाली. यापैकी प्रत्येक मतदारसंघातून २ ते ४ उमेदवारांची यादी निश्चित झाली आहे. ही यादी राज्यातील नेते दिल्लीला जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सोपविणार आहेत. यातून अंतिम उमेदवारी भाजपाची केंद्रीय निवडणूक समिती जाहीर करेल. या बैठकीला मुख्यमंत्री विजय रुपाणी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी व गुजरात प्रभारी ओम माथूर यांच्यासह मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.गांधीनगर मतदारसंघाबाबत मंडळाने नावे दिली नसून तो निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपविला आहे. १९९१ पासून येथून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी साततत्याने निवडून आले. या जागेवर कोणीतरी केंद्रीय नेत्याने निवडणूक लढवावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पक्षाने आता येथून भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देऊन अडवाणी यांना रिटायर्ड केले आहे. पक्षाचे दोन विद्यमान खासदार लीलाधर वाघेला (पाटण) व विठ्ठल राराडिया (पोरबंदर) यांनी याआधीच प्रकृतीच्या कारणाने निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे.कॉँग्रेसने घेतली आघाडी; चार उमेदवार जाहीरसन २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने गुजरातमधील सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या राज्याबाबत कॉँग्रेस अतिशय सावध आहे. कॉँग्रेसने या राज्यातील चार उमेदवारांची नावे जाहीर करून प्रतिस्पर्ध्यावर आघाडी घेतली आहे. कॉँग्रेसने राज्यातील अहमदाबाद (पश्चिम) येथून राजू परमार, आणंदमधून भारतसिंह सोळंकी, वडोदरातून प्रशांत पटेल आणि छोटा उदेपूर येथून रणजित राठवा या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये कॉँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भाषणे झाली होती. यानिमित्ताने काँग्रेसने आपल्या या राज्यातील प्रचाराचा शुभारंभही केला आहे.
गुजरातमधील भाजपाचे पॅनल तयार, दोन खासदार नाही लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 5:04 AM