नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे व वाणिज्य, उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेतील भाजपच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याआधी हे पद केंद्रीय मंत्री रविप्रसाद यांच्याकडे होते. मात्र, ते आता लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागी गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यसभेतील भाजपच्या नेतेपदी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत आहेत. पीयूष गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते भाजपचे माजी खजिनदार आहेत. बिहारमधून लोकसभेवर निवडून आलेले भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांची त्या सभागृहात पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड झाली आहे. लोकसभेचे मुख्य प्रतोद म्हणून प्रल्हाद जोशी यांची नेमणूक झाली आहे. खजिनदार म्हणून मुंबईतून निवडून गेलेले गोपाळ शेट्टी यांना नेमण्यात आले आहे. तसेच राज्यसभा व लोकसभेसाठी राज्यवार अनेक प्रतोद नेमण्यात आले आहेत. त्यात लोकसभेतील महाराष्ट्राचे प्रतोद म्हणून कपिल पाटील यांना नेमले आहे. याखेरीज भाजपने संसदीय मंडळाची कार्यकारिणी निश्चित केली असून, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा असून, लोकसभेचे उपनेते म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आहेत.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात वित्तमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या खात्याची जबाबदारी काही काळ पीयूष गोयल यांनी सांभाळली होती. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात अरुण जेटलींचा समावेश मंत्रिमंडळात असणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर वित्तमंत्रीपदी गोयल यांची निवड केली जाईल, अशी अटकळ होती. मात्र, त्यांना रेल्वेमंत्री करण्यात आले. ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपच्या प्रचार मोहीम समितीचे प्रमुख होते.