लखनौ - उत्तर प्रदेशात भाजपाला रोखण्यासाठी सपा आणि बसपा हे राज्यातील दोन मातब्बर पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात घडत बिघडत असलेल्या राजकीय समीकरणांवर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बारीक नजर असून, सपा-बसपाचे आव्हान आणि विद्यमान खासदारांविरोधात असलेल्या नाराजीचा सामना करण्यासाठी भाजपाने प्लान बी आखला आहे. त्यानुसार लोकसभेच्या पुढील निवडणुकीत भाजपा उत्तर प्रदेशमधील आपल्या मातब्बर नेत्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीसाठी सपा आणि बसपामधील आघाडीची औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पण अशा आघाडीची शक्यता गृहित धरून भाजपाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार सपा आणि बसपा एकत्र येऊ नयेत, यासाठी भाजपा प्रयत्नळील आहे. मात्र तरीही सपा आणि बसपा एकत्र आलेच तर त्यांचा सामना करण्यासासाठी भाजपाने स्वत:ला तयार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या 71 उमेदवारांपैकी 50 टक्के उमेदवारांना यावेळी संधी देण्यात येणार नाही, अशा परिस्थितीत निवडणून येऊ शकणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल जेणेकरून राज्यातील जागांचे गणित बिघडणार नाही, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. मिळत असलेल्या माहितीनुसार ज्यांची आपापल्या मतदारसंघांमध्ये पकड आहे अशा प्रभावी मंत्र्यांची यादी भाजपाकडून तयार करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री सतीश महाना, एस.पी. शाही, दारा सिंह चौहान, एसपीएस बाघेल आणि विधानसभा सभापती हृदय नारायण दीक्षित यांची नावे लोकसभा उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. विकास आणि भावनात्मक मुद्दे घेऊन भाजपा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत आहे.
सपा-बसपाला रोखण्यासाठी भाजपाने आखला प्लान-B
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 4:19 PM