लखनौ : भाजपा घृणा आणि द्वेषाचे राजकारण करीत आहे आणि हे राजकारण समाज आणि देशासाठी अतिशय घातक आहे, असा स्पष्ट आरोप उत्तर प्रदेशचे विधिमंडळ कामकाजमंत्री आजम खान यांनी केला आहे.भाजपा दलितांना भडकावून त्यांच्यात आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुरादाबादची घटना मुजफ्फरनगर दंगलीप्रमाणेच सुनियोजित कट रचून घडविण्यात आली आहे, असे सांगून आजम खान म्हणाले, भाजपाने लोकसभा निवडणुकीत मुजफ्फरनगर दंगलीचा राजकीय फायदा घेतला. आता विधानसभेच्या १२ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत फायदा घेण्यासाठी मुरादाबादेतही मुजफ्फरनगरसारखे वातावरण तयार करीत आहे. मुरादाबाद कांडामागे पोटनिवडणुकीत फायदा करून घेणे हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. मुरादाबादच्या कांठमध्ये घडलेल्या हिंसाचारामागे स्थानिक नव्हे तर बाहेरच्याच लोकांचा हात आहे. त्यासाठी हरियाणा व शेजारच्या राज्यातून भाजपाने आपले लोक आणले होते. त्यामुळेच हिंसाचार माजवणारे हे लोक चेहऱ्यावर फडके बांधून फिरत होते. भाजपाचा लोकशाही व देशातील कायद्यावर अजिबात विश्वास नाही, असे खान म्हणाले. याआधी आजम खान यांनी भाजयुमोच्या हिंसक आंदोलनाची तुलना संसदेवरील दहशतवादी हल्ल्याशी केली होती. (वृत्तसंस्था)
भाजपाचे राजकारण देशासाठी घातक -आजम
By admin | Published: July 07, 2014 4:39 AM