नवी दिल्ली : भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध राष्ट्रीय जनता दल यांच्यातील ‘काँटे की टक्कर’ यामुळे सगळ्या देशाचे लक्ष बिहारकडे लागलेले असले तरी तब्बल ५६ जागांवर पोटनिवडणुकीसाठी ११ राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यातील ५४ जागांसाठी आज, मंगळवारी मतदान होत असून उर्वरित दोन जागा मणिपूरमधील असून त्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ज्या ५६ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यात मध्यप्रदेशातील २८ जागांचा समावेश आहे. या निकालांवर मध्यप्रदेश सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस या दोन्हींसाठी या पोटनिवडणुका प्रतिष्ठेचा मुद्दा बनल्या आहेत.ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने मध्यप्रदेशात २८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. २०१८ मध्ये झालेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ११४, तर भाजपला १०९ जागांवर विजय मिळाला होता. २३० सदस्यांच्या मध्यप्रदेश विधानसभेत कोणालाही बहुमत मिळाले नाही; परंतु काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात पोटनिवणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ, विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. याशिवाय गुजरातमध्ये आठ, उत्तर प्रदेशात सात, ओडिशा, नागालँड, कर्नाटक आणि झारखंड येथे प्रत्येकी दोन तर छत्तीसगढ, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यांत प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. बिहारमधील वाल्मीकीनगर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. (वृत्तसंस्था)
भाजपच्या लोकप्रियतेची ५६ पोटनिवडणुकांतून परीक्षा; मध्यप्रदेश, गुजरात आदी ११ राज्यांत आज मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 5:08 AM