ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - दादरीमध्ये बीफ बाळगल्याच्या अफवेवरून एका मुस्लीमाची झालेली हत्या ही भाजपाची पूर्वनियोजित खेळी असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. मोहम्मद अखलाख यांची बिसारा गावामध्ये जमावाने हत्या केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले. या घटनेवर एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अखिलेश यांनी हा हल्ला उत्स्फूर्त होता यावर आपला विश्वास नसल्याचे सांगितले.
सरकारने केलेल्या तपासात आढळलेल्या तथ्यांनुसार भाजपा आणि भाजपाशी संबंधित व्यक्तिंनी अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने हा प्रकार घडवून आणल्याचे जाणवत असल्याचे अखिलेश म्हणाले.
भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांना उत्तर प्रदेशातले भाजपाचे नेते काय करत आहेत, याची व्यवस्थित कल्पना असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपा उत्तर प्रदेशात धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लोकांचं लक्ष राजकीय मुद्यांवरून हटवण्यासाठी आणि समाजामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी भाजपा युपीमध्ये सारखे वेगळे मुद्दे उचलत असल्याचे सांगताना अखिलेश यांनी आधी लव्ह जिहाद मग धरवापसी नंतर मुरादाबादमध्ये ध्वनीवर्धक यंत्रणेविरुद्ध आक्षेप आदी उदाहरणे दिली.
अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीची मुस्लीमांची मते मिळावी यासाठी भाजपाच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना फूस असल्याचा आरोप अखिलेश यांनी फेटाळला आहे. मुझफ्फरनगरच्या दंगलीचा लाभ कुणाला झाला असा प्रतिप्रश्न करताना नंतरच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये युपीमध्ये भाजपाला ७३ जागा मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. समाजवादी पार्टीला आधीच्या निवडणुकीत ३९ जागा मिळाल्या होत्या, ज्यांची संख्या ५ वर आली. उत्तर प्रदेशात तणाव निर्माण करण्याची भाजपाची योजना असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंतवणुकीसाठी जगभरात फिरत असल्याचे सांगताना अखिलेश म्हणाले की अशा घटनांमुळे मोदींच्या प्रयत्नांना खिळ बसेल. भाजपाचे काही नेते वाट्टेल ते बोलत आहेत, त्यांच्यावर कुणाचा अंकुश आहे ते भाजपाने स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी केली.
बिहारच्या निवडणुकांमागोमाग काही महिन्यातच, २०१७च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत आणि २०१२मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अखिसेलश यादव यांचा कस लागणार आहे. राज्यातली कायदा व सुव्यवस्था आणि वाढता धार्मिक तणाव यामुळे त्यांच्यावर सध्या सर्व स्तरातून टीका होत आहे.