मुंबई : झारखंडमध्ये भाजपला अहंकार भोवला असून तेथील जनतेने केंद्रात सत्ता आणि आर्थिक ताकद असलेल्या भाजपला नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली. झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला असून झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे. या निकालावर खा. पवार म्हणाले, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान पाठोपाठ महाराष्टÑ आणि आता झारखंडच्या सत्तेतून भाजप पायउतार झाला आहे. पराभवाची ही मालिका अशीच सुरूच राहाणार आहे. या निकालामुळे अन्य राज्यांना भाजपचा एकत्रित सामना करण्याचा विश्वास मिळाला आहे, असेही पवार म्हणाले.
मंत्रिमंडळात व संसदेत एनआरसीबाबत विरोध झाला नाही असे पंतप्रधान मोदींनी कालच्या सभेत सांगितले. पण ते चुकीचे आहे. संसदेत मी आणि आमचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एनआरसीबाबतचे दुष्परिणाम सांगितले होते. शिवाय राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहात अभिभाषणाच्यावेळी एनआरसी विषय सांगितला होता. राष्ट्रपती बोलतात ते सरकारचे धोरण असते. केंद्रीय गृहमंत्री एनआरसीचा निर्णय देशासाठी घेतल्याचे सभागृहात सांगतात आणि दुसरीकडे पंतप्रधान वेगळे कसे बोलतात, असा सवाल पवार यांनी केला.सत्तेत बसलेल्या लोकांनी शांततेने पाऊले टाकायची असतात; परंतु सध्याचे सरकार ज्यापध्दतीने धार्मिक अंतर ठेवण्याचा आणि एकतेला ठेच पोचेल अशी पाऊले टाकताना दिसत आहे, एनआरसी विरोधात देशातील एक मोठा हिस्सा रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त करत आहे, असे ते म्हणाले.