सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘’ये गुजरात मै बनाऊ छै’’ या संवादापासून बहुतांश भगवे ध्वज, महिला व पुरुषांनी परिधान केलेली भगवी वस्त्रे, डोईवर भगव्या टोप्या अन् स्पीकरवर निनादणारे ‘’मुझे चढ गया भगवा रंग रंग....’’ हे गीत, ऐकून अनेकांना ती धार्मिक यात्रा वाटावी, असाच तिचा थाट असतो, पण प्रत्यक्षात ती भाजपची प्रचाराची रणधुमाळी असते.
भाजप आणि इव्हेंट असे झालेले समीकरण या प्रचार फेऱ्यातूनही स्पष्ट दिसते. खास तयार केलेले व सुंदर सजवलेले चकचकीत रथ. मोदींचे भव्य कट आऊट, त्या खालोखाल अमित शहा, अध्यक्ष नड्डा आणि कुठेतरी लपलेले प्रदेश अध्यक्ष व उमेदवारांच्या छबी असतात. त्यावर दिला जाणारा तीन मिनिटांचा ध्वनिमुद्रित संदेश. याचा प्रारंभच होतो, ‘’ये गुजरात मैने बनाया है’’, या मोदी यांच्या संवादाने. भाजपच्या प्रचारातील झगमगाटासमोर काँग्रेस व आपच्या प्रचारफेऱ्या फिक्या पडल्या आहेत.