रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने भाजपाला धोबीपछाड दिला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र रघुवर दास यांचा पराभव विरोधी पक्षाच्या कुण्या उमेदवाराने नव्हे तर भाजपाच्याच एका बंडखोर ज्येष्ठ नेत्याने केला आहे. बिहार आणि झारखंडमधील मिळून तीन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खायला लावणाऱ्या आणि ऐन निवडणुकीपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या सरयू राय यांनी रघुवर दास यांचा पराभव केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले सरयू राय हे रघुवर दास यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र राय आणि दास यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते. त्यामुळे सरयू राय हे रघुवर दास यांच्या कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयांना विरोध करत असत. तसेच अनेकदा कॅबिनेटच्या बैठकीस अनुपस्थित राहत असत. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे अखेरीस त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधात जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच निर्णय घेतला. तसेच रघुवर दास यांचा मोठ्या मताधिक्याने पराभवही करून दाखवला. सरयू राय यांनी रधुवर दास यांच्यावर निर्णायक मतांची आघाडी घेतली आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून राय यांच्या विजयाची घोषणा अध्याप झालेली नाही. झारखंडमधील राजकारणाचा विचार केल्यास या राज्यात गेल्या 19 वर्षांत अनेक मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता त्यात रघुवर दास यांचेही नाव दाखल झाले आहे. दरम्यान, रघुवर दास यांना पराभूत करणाऱ्या सरयू राय यांनी पशुपालन घोटाळ्यासह अनेक घोटाळे उघडकीस आणलेले आहेत. तसेच लालू प्रसाद यादव अनेक नेत्यांना तुरुंगाची वाट दाखवली होती.
भाजपाच्या बंडखोर नेत्यानेच दिला झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:39 PM