नवी दिल्ली : सिक्किममधील प्रमुख पक्ष सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ) च्या 10 आमदारांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये येत भाजपात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्यासह 5 आमदारांना सोडून अन्य आमदारांनी भाजपाचा रस्ता धरला आहे. याचबरोबर सिक्किममध्ये अद्याप खातेही उघडू न शकलेल्या भाजपाचे एका झटक्यात 10 आमदार झाले आहेत.
एसडीएफने गेल्या 25 वर्षांपासून सिक्कीमवर सत्ता गाजविली आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि महासचिव राम माधव यांच्या उपस्थितीत या 10 आमदारांनी भाजपात प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला भोपळाही फोडता आला नव्हता.
1993 मध्ये पवन चामलिंग यांनी एसडीएफची स्थापना केली होती. पक्षाने यानंतरच्या सर्व पाचही विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळविला होता. 1994, 1999, 2004, 2009, 2014 मध्ये पूर्ण बहुमतात या पक्षाचे सरकार होते. मात्र, यंदा झालेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. यंदा सिक्किम क्रांतीकारी मोर्चाचे सरकार आले आहे.
एसडीएफमधून फुटून 2013 मध्ये प्रेम कुमार तमांग यांनी सिक्किम क्रांतीकारी मोर्चाची स्थापना केली होती. पक्ष फुटूनही 2014 मध्ये एसडीएफचे सरकार आले होते. मात्र, 2019 मध्ये तमांग यांनी एसडीएफची 25 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली. एसडीएफला 15 आणि एसकेएमला 17 जागा मिळाल्या. 32 जागांच्या विधानसभेत तमांग यांचे सरकार बहुमतात आले. लोकसभेची एक जागाही एसकेएमच्या ताब्यात आहे.
एसडीएफच्या आमदारांनी भाजपात प्रवेश केला असला तरीही सत्तेची समीकरणे बदललेली नाहीत. एसडीएफचे पाच आमदार, भाजपाचे 10 आणि सत्ताधाऱ्यांचे 17 आमदार असणार आहेत.