कोहिमा - नागालँडमधील एक महिला पहिल्यांदाच राज्यसभेची सदस्य होणार आहे. एस फांगनोन कोन्याक असे या महिलेचे नाव आहे. 2017 मध्ये एस फांगनोन कोन्याक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. दरम्यान, रानो एम शाजा यांच्यानंतर 45 वर्षात संसद सदस्य होणाऱ्या त्या नागालँडमधील दुसऱ्या महिला आहेत. एस फांगनोन कोन्याक आता एकप्रकारे निर्वाचित खासदार आहेत, कारण 21 मार्चच्या अंतिम मुदतीपर्यंत इतर कोणत्याही उमेदवाराने द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्या सत्ताधारी युनायटेड डेमोक्रॅटिक अलायन्सच्या (UDA) एकमताने निवडलेल्या उमेदवार आहेत.
एस फांगनोन कोन्याक यांची राज्यसभेसाठी निवड झाल्यास 45 वर्षात त्या नागालँडमधून संसदेच्या सदस्य बनलेल्या दुसऱ्या महिला ठरतील. याआधी रानो एम शाजा या 1977 मध्ये राज्यातून लोकसभा खासदार म्हणून निवडून आलेल्या पहिल्या नागा महिला ठरल्या होत्या. 1963 मध्ये नागालँडला राज्याचा दर्जा मिळाल्यापासून त्या एकमेव महिला खासदार होत्या. मात्र, 58 वर्षांपूर्वी राज्याच्या स्थापनेनंतरही नागालँडमध्ये अद्याप पहिली महिला आमदार निवडून आलेली नाही. नागालँडच्या राजकारणात स्त्रीला पुढे जाणे किती अवघड आहे, हे यावरून स्पष्ट होते. एस फांगनोन कोन्याक यांची राज्यसभेवर निवड झाल्यास नागालँडच्या महिलांना राजकारणात पुढे येण्याची प्रेरणा मिळेल.
एस फांगनोन कोन्याक यांनी 2002 मध्ये दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली. कॉलेजमध्ये, विद्यार्थी राजकारण आणि सामाजिक संघटनांमध्ये सामील होऊन त्या राजकारणात सक्रिय होत्या. तसेच, एस फांगनोन कोन्याक यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. उमेदवारी दाखल केल्यानंतर, यूडीएचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या नागा पीपल्स फ्रंट (NPF) नेही राज्यसभेसाठी आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर एनपीएफने माघार घेतली. एनपीएफचे अध्यक्ष डॉ. शुर्होजिली लिजित्सू म्हणाले की, पक्षाला उमेदवार निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांचा पाठिंबा मिळाला नाही.