पुरी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.
ओडिशामधील पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संबित पात्रा मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराचे नवनवे फंडे अजमावत आहेत. रविवारी ओडिशामधील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिरासमोर संबित पात्रा यांनी लोटांगण घातले. संबित पात्रा यांचा प्रचारादरम्यानचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
याआधी संबित पात्रा यांचा दोन दिवसांपूर्वी एका प्रचार सभेत 'तुम मिले तो दिल खिले' हे हिंदीतील गाणं तमिळ भाषेत गायले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, संबित पात्रा यांनी स्वत: हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता.
दरम्यान, लोकसभेच्या पुरी मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला होत आहे. भाजपने प्रवक्ते संबित पात्रा यांना आडिशामधील पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने सत्यप्रकाश नायक यांनी उमेदवारी दिली आहे. तर बीजेडीने पुन्हा एकदा पुरी मतदारसंघातून पिनाकी मिश्रा यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.
(मोदींच्या उज्ज्वला योजनेची संबित पात्रा यांच्याकडूनच पोलखोल ?)