सुरुवातीला १९५ उमेदवारांची घोषणा केल्यानंतर भाजपाने दुसऱ्या यादीची तयारी सुरु केली आहे. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पक्षाच्या सीईसीच्या बैठकीत जवळपास ९० उमेदवारांची नावे फायनल करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील २५ नावे असल्याचे समजते आहे. यामुळे या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील भाजपा लढविणाऱ्या बहुतांश जागांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
पक्षाच्या सुत्रांनुसार या बैठकीत सात राज्यांतील जवळपास ९० उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. या यादीची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अद्याप जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच आहे. भाजपाला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला आपल्या जागा सोडायच्या नाहीत. यामुळे शिंदे- फडणवीस-पवारांच्या दिल्लीतही बैठका होत आहेत.
य़ा बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री, खासदार आणि त्या त्या राज्यांची जबाबदारी असलेले नेते उपस्थित होते. यावेळी गुजरातमधील उरलेल्या ११ जागांचे उमेदवार ठरविण्यात आले. मध्य प्रदेशच्या देखील पाचपैकी चार जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील २५, तेलंगानातील ८, हिमाचलमधील चार व कर्नाटकमधील सर्व २८ जागांवरील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली आहे.
भाजपा-सेना-राष्ट्रवादी किती जागा लढविणार...राज्यातील भाजपच्या नेत्यांनी ३४ ते ३५ जागा महायुतीमध्ये आपल्याकडे घ्या, असा हट्ट दिल्लीतील श्रेष्ठींकडे धरला असला तरी तो अद्याप मान्य झालेला नाही. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीने सन्मानजनक वाटा देण्यासाठी दबाव वाढविल्याने भाजपला हा आकडा गाठता येण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आता भाजप ३१, शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ४ असा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र तिढा कायम आहे.