कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने 23 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने आतापर्यंत एकूण 224 पैकी 213 नावे जाहीर केली आहेत. महत्वाचे म्हणजे, अद्याप ईश्वरप्पा आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या जागेसाठी कुठल्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
या आमदारांचे तिकिट कापले - कोलार गोल्ड फील्ड (केजीएफ) मधून भाजप उमेदवार म्हणून अनुसूचित जातीचे उमेदवार अश्विनी संपांगी मैदान आहेत. दावणगेरे उत्तरमधील आमदार रवींद्रनाथ यांचे तिकिट कापून त्यांच्या जागी लोकीकेरे नागराज यांना भाजपने उमेदरावी दिली आहे. याशिवाय, बिंदूरचे विद्यमान आमदार सुकुमार शेट्टी यांचेही नाव या यादीत नाही. त्यांच्या ऐवजी गुरूराज गुंटूर यांना पक्षाने तिकिट दिले आहे. तसेच, हावेरी येथून नेहरू ओलेकर यांच्या जागी गावीसिद्धप्पा यांना तिकिट देण्यात आले आहे.
ईश्वरप्पा यांच्या समर्थनार्थ राजीनाम्याची रांग -पक्षाच्या अनेक नेत्यांनी स्वतःहून समोर येत राजीनामा दिला आहे. शिवमोगामध्ये तर राजीनाम्यांची लाईन लागली आहे. येथे महापालिकेच्या 19 सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. महापौर आणि उपमहापौर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवमोगाच्या जिल्ह्या अध्यक्षांनीही ईश्वरप्पा यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला आहे. याशिवाय इतरही काही नेते राजीनामा देण्यासंदर्भात भाष्य करत आहेत. याशिवाय, जगदीश शेट्टार यांनाही यावेळी भाजपने तिकिट दिलेले नाही.