दिल्लीतील विधानसभा निवडणूकीत तेरा जागांसाठी भाजपची खास रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:04 AM2020-02-05T03:04:49+5:302020-02-05T03:05:34+5:30
चुरशीची लढत होणार
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : मतदानाला अवघे चार दिवस बाकी असताना राजकीय पक्ष आपापले दावे करीत आहेत; परंतु आकडेवारी पाहता दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दरवेळी बारा जागांवर चुरशीची लढत होते. जय-पराजयात फारसे अंतर नसते. सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने या जागा महत्त्वाच्या असतात. मागच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळविला होता. या निवडणुकीत फक्त चार-पाच जागांवर पाच हजारांहून कमी मतांनी उमेदवार जिंकले होते.
मागच्या निवडणुकीत १५०० ते १२ हजार मतांच्या फरकाने भाजपला विजय मिळाला आणि पराभव स्वीकारावा लागला अशा १३ जागांसाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत २३ जागांचा फैसला पाच हजारांपेक्षाही कमी मतांनी झाला होता. यापैकी पाच जागांवर मतांतील फरक एक हजारांहूनही कमी होता.
२००८ च्या निवडणुकीतही अशीच स्थिती होती. त्यावेळी जवळपास २५ जागांवर पाच हजारांपेक्षा कमी मतांनी उमेदवार विजयी झाले होते. भाजप दिल्ली प्रदेशच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत १३ जागांचा फैसला दोन हजारांपेक्षा कमी मतांनी झाला. यापैकी पाच जागांवर मतांचा फरक एक हजारपेक्षाही कमी मतांचा होता. यापैकी तीन जागांवर ५०० मतांचा फरक होता. यावेळी या जागांसाठी चुरशीची लढत होत आहे.
खेळ आकड्यांचा
आर. के.पुरम मतदारसंघातून आम आदमी पार्टीचा उमेदवार ३२६ मतांनी पराभूत झाला होता. दिल्ली छावणी मतदारसंघात ‘आप’ने भाजपला ३५५ मतांनी पराभूत केले होते. विकासपुरी, संगम विहार आणि सदर बाजार मतदारसंघात भाजपला ४०५ ते ७९६ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.२०१३ च्या निवडणुकीत मादीपूर, सुलतानपूर माजरा या जागांचा फैसला ११०० मतांनी झाला होता.