नवी दिल्ली - झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपाकडून नव्या रणनीतीची तयारी सुरु आहे. राज्यात ५० टक्क्याहून अधिक मतदान मिळवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी स्थानिक नेतृत्वाला पुढे आणणं, समान विचारधारेच्या प्रादेशिक पक्षांशी आघाडी करणे याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येत आहे.
झारखंडमध्ये जेवीएम(पी) नेते बाबूलाल मरांडी यांना पुन्हा भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा नेतृत्वाने भविष्यात राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये संभाव्य मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देण्याला प्राधान्य देईल. मागील आठवड्यात झालेल्या चिंतन बैठकीत यावर चर्चा झाली. दिल्ली, झारखंडमधील पराभवाचं कारण म्हणजे या राज्यात भाजपाने लोकप्रिय असलेल्या उमेदवाराची निवड केली नव्हती. झारखंडमध्ये रघुवर दास यांच्या नेतृत्वात पक्षाने निवडणूक लढवली, मात्र त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीच्या बातम्या नेतृत्वाला मिळत होत्या. तर दिल्लीत कोणालाची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भाजपाने घोषित केलं नाही.
भाजपाच्या सूत्रांनुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे भाजपा नेतृत्वात चिंतेच वातावरण आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाला मित्रपक्षांसोबत १७ राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. मात्र राज्यातील निवडणुकीत ते खूप मागे राहिले. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुर्वेकडील राज्यात भाजपाला प्रादेशिक पक्षाचं कडवं आव्हान आहे.
पक्षाच्या रणनीतीकारांनी सांगितले की, राज्यात ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवण्याचं आमचं लक्ष्य आहे. कारण जर प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत गेल्यास निवडणुकीत त्यांना मिळणारं मतदान अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रादेशिक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासोबतच प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करण्याची रणनीती पक्षाने समोर आणली आहे.
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डिवेलपिंग सोसायटीचे संचालक संजय कुमार यांनी सांगितले की, भाजपाने राज्यात सक्षम चेहरा न दिल्याने पक्षाला काही प्रमाणात याचा मोठा फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सर्वात लोकप्रिय आहेत यात शंका नाही पण प्रादेशिक निवडणुकीत त्यांच्या मर्यादा असतात. दिल्लीनंतर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र अद्याप पश्चिम बंगालमधील रणनीती स्पष्ट नाही.