भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचं आव्हान भाजपासमोर आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांमध्ये सुरुंग लावण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. येत्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. ज्या भागात पक्ष कमकुवत आहे, अशा ठिकाणी विरोधी पक्षांमधील नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची वातावरणनिर्मिती होत असताना पक्षप्रवेशाचे हे कार्यक्रम होणार आहेत. त्यात भाजपाकडून काँग्रेसला मुख्य लक्ष्य बनवले जाणार आहे.
भाजपाला धक्का देण्यासाठी भाजपाने ही व्युहरचना अंमलात आणली आहे. कुणाला पक्षात प्रवेश द्यायचा याचा विचार करण्यासाठी भाजपाकडून आधीच एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंह यादव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि सरचिटणीस (संघटना) बी.एल. संतोष यांचा समावेश आहे. ही समिती विरोधी पक्षांमधील नेत्यांची छाननी करून त्यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत विचार करतील.
भाजपाने आपल्या सर्व मुख्यमंत्र्यांना आणि माजी मुख्यमंत्र्यांना या कामामध्ये गुंतवले आहे. केरळमध्ये के. जे. अल्फोन्स, टॉम वडक्कन, अनिल अँटनी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसर हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक काँग्रेस नेतेही भाजपाच्या संपर्कात आहेत.
सध्या विरोधी पक्षांकडे नरेंद्र मोदींच्या विरोधात राहुल गांधींच्या रूपात मुख्य चेहरा आहे. तसेच राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना थेट निशाण्यावर घेतात. तर राहुल गांधींना कमकुवत करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. त्यामुळेच काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या अनेक नेत्यांना चांगली पदं देण्याचा धडाका भाजपाने लावला आहे.