बंगळुरू : कर्नाटकात दोन दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जनता दल सरकारने शुक्रवारी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर विरोधी पक्षनेते येडियुरप्पा यांनी भाषण केले खरे, पण ठराव मतदानास टाकण्याआधी भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात एकही मत पडले नाही.विधानसभाध्यक्षपदीही काँग्रेसचे के. आर. रमेशकुमार यांची एकमताने निवड झाली. त्यांच्या विरोधातील भाजपाचे उमेदवार एस. सुरेशकुमार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने रमेशकुमार बिनविरोध निवडून आले. विधानसभाध्यक्षासाठीची निवड व विश्वासदर्शक ठराव या दोन्हींत भाजपा सहभागी झाला नाही.भाजपाचे विधानसभेत १0४ सदस्य असताना, त्यांनी ताकद दाखवायला काहीच हरकत नव्हती. त्यामुळे त्यांनी हे का केले, असा प्रश्न विचारला जात आहे. ठरावाच्या वेळी काँग्रेस, जनता दल, बसपा व अपक्ष या साऱ्यांनी कुमारस्वामी यांच्या बाजूने मतदान केल्याचे ११७ मतांमुळे स्पष्ट झाले. कुमारस्वामी यांनी आपले सरकार पाच वर्षे राहील, असा दावा याप्रसंगी केला.भाजपाचा ‘बंद’चा इशाराविश्वासदर्शक ठरावावरील भाषणात येडियुरप्पा यांनी कुमारस्वामी सरकारने शेतकºयांची १ लाख रुपयांपर्यंतची कर्जे लगेच माफ न केल्यास रविवारपासून राज्यव्यापी बंद करण्याचा इशारा दिला.
कुमारस्वामींवर विश्वास भाजपाचा सभात्याग; अध्यक्षपदाचा उमेदवारही मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:35 AM