संजय शर्मा -
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये पराभव झाल्यानंतर माेदी सरकार आणि भाजपमध्ये माेठे फेरबदल हाेण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या निकालामुळे माेदी सरकारला २०२४ मध्ये हाेणाऱ्या लाेकसभा निवडणुकीची चिंता लागली आहे. ती ध्यानात ठेवून पंतप्रधान माेदी लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात. तसेच पक्ष पातळीवरही संघटनात्मक फेरबदल हाेण्याची शक्यता आहे.माेदी सरकारला ९ वर्षे पूर्ण हाेणार आहेत. मात्र, कर्नाटकमधील पराभवामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. हा जल्लाेष साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच कर्नाटकच्या पराभवामुळे पक्षात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. नरेंद्र माेदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात चर्चा झाली असून, लवकरच माेदी सरकारमध्ये बदल दिसणार आहेत. पीएमओने सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल दिसू शकताे.
हे आहे चिंतेचे कारण...महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, पंजाब या राज्यांमध्ये लाेकसभेच्या १९२ जागा आहेत. तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळच्या १०१ जागांवर भाजप कुठेच नाही. आता लाेकसभेच्या २८ जागा असलेले कर्नाटकही हातचे गेले. या जागा विचारात घेऊन मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे.
- लाॅकेट चॅटर्जी आणि दिलीप घाेष यांना मंत्रिपद देऊन पश्चिम बंगालच्या ४२ जागांवर डाेळा.- तामिळनाडू, केरळ, आंध्रमधून केंद्रात मंत्रिपद मिळू शकते.- पराभवानंतर महाराष्ट्राचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवि यांनाही बदलण्याची चर्चा आहे.
संघटनात्मक फेरबदल राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला, त्याचवेळी त्यांची संपूर्ण टीम २०२४ पर्यंत कायम राहणार असे ठरले हाेते. लाेकसभा निवडणुकीनंतरच नवे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड हाेईल. नड्डा यांचे गृहराज्य हिमाचलमध्ये तसेच संघटन सरचिटणीस बी. एल. संताेष यांचे गृहराज्य कर्नाटकमध्येही सत्ता गेली. त्यामुळे लाेकसभा निवडणुकीसाठी पक्षाला सक्षम चेहरे आवश्यक वाटू लागले आहेत. भूपेंद्र यादव व धर्मेंद्र प्रधान यांच्यासह काही मंत्र्यांना पक्षकार्य दिले जाऊ शकते.