स्व. विलासराव देशमुखांविना पोरका झालेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला गड राखण्याचे आव्हान आहे. अडीच लाखाच्या आघाडीने लोकसभेनंतर जिल्ह्यातील भाजपा चैतन्याने तर काँग्रेस सुडाने पेटली आहे. काँग्रेसने चार उमेदवार घोषित केलेत़ औसा या सेनेच्या गडात पाशा पटेलांनी शड्डू ठोकला आहे़ आता युतीच्या उमेदवारीकडे लक्ष आहे़ जिल्ह्यात सहा मतदारसंघ. लातूर शहरातून राज्यमंत्री अमित विलासराव देशमुख दुसऱ्यांदा लढणार आहेत. पिताश्री नसल्याने त्यांची कसोटी आहे. अमित हे विलासरावांसारखे ‘लोक’नेते नाहीत, हा जनआक्षेप तीव्र असून तो पुसण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यासमोर कोण यात सेना-भाजपात कलगीतुरा रंगला आहे. सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ मतदारसंघापैकी लातूर एक असून श्रीपाद उर्फ पप्पू कुलकर्णी हे गेल्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी फेकले गेले. पण पप्पू ‘मेरी झांसी नही दूँगा’ म्हणतात. मुंडे-देशमुख मैत्रीत सेनेला गेलेली ही जागा भाजपाला परत हवी असून काँग्रेसशी काडीमोड केलेले माजी उपनगराध्यक्ष शैलेश लाहोटींनी यासाठी गळ टाकलाय. त्यांनाही निष्ठावंतांचा विरोध आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या अॅड़ अण्णाराव पाटील यांनी लातूर शहरातून मुख्यमंत्र्यांच्या कराड मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे़ लातूर ग्रामीण हा देशमुखांचा ‘शुगर बेल्ट’ मतदारसंघ. विधानसभा बिगुल वाजेपर्यंत अमित व दिलीपराव हे काका-पुतणे फारसे जवळ नव्हते. मात्र आता काकांनीच अमित आणि धीरज या पुतण्यांना भीम-अर्जुन म्हणत सारथ्य हाती घेतले आहे. आ. वैजनाथ शिंदे यांच्या जागी दिलीपरावांनी लढावे, असा सूर अमित यांनी धरला. मात्र दिलीपरावांनी वैजनाथदादांचाच रेटा लावून धरला होता़ तरीही त्र्यंबकनाना भिसे यांची उमेदवारी घोषित झाली़ गेल्या वेळी थोडक्यात पडलेल्या भाजपा नेते रमेश कराडांची तयारी पाच वर्षांपासून असल्याने यंदा चुरस निर्माण होणार आहे. तर निलंग्यात काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री ‘आजोबा शिवाजीराव’ आणि भाजपाचे आ. ‘नातू संभाजीराव’ असे दोन्हीकडे निलंगेकरच होते़ त्र्याऐंशी वयाच्या शिवाजीरावांऐवजी पुत्र अशोकराव निलंगेकर यांची उमेदवारी घोषित झाली़ आता त्यांच्या पुढ्यात भाजपाकडून भावजय माजी खासदार रूपाताई की पुतणे माजी आमदार संभाजीराव असा प्रश्न आहे़ निलंगेकरांच्या या कौटुंबिक महाभारतात मनसेच्या अभय साळुंकेंनी ‘निलंगेकर हटाव’ चा नारा दिलाय.उदगीरचे भाजपा आमदार सुधाकर भालेरावांचा लोकसभेला खा. सुनील गायकवाडांनी पत्ता कापला. आता विधानसभेला गायकवाडांचे पुतणे विश्वजित स्पर्धेेत आलेत. तिथे राष्ट्रवादीच्या संजय बनसोडेंनीे उदगीर पिंजून काढलेय.
काँग्रेसचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपाचा जोर
By admin | Published: September 26, 2014 2:29 AM