कर्नाटकचा गड राखण्यासाठी भाजपचं ट्रम्प कार्ड, या खास अभियानानं काँग्रेसला चीत करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 16:49 IST2023-04-20T16:48:36+5:302023-04-20T16:49:06+5:30
कर्नाटकात राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेला लिंगायत समाज जवळपास 17 टक्के आहे. या समाजाचे अधिकांश लोक राज्याच्या उत्तर भागात आहेत. या समाजाकडे भाजप आपला मजबूत समर्थक वर्ग म्हणून पाहते.

कर्नाटकचा गड राखण्यासाठी भाजपचं ट्रम्प कार्ड, या खास अभियानानं काँग्रेसला चीत करणार?
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लिंगायत नेत्यांनी, सत्ताधारी पक्ष ‘लिंगायत विरोधी’ (Anti Lingayat) असल्याचे म्हणाऱ्या काँग्रेसला उत्तर देण्यासाठी आता कर्नाटकात ‘लिंगायत मुख्यमंत्री’ (Lingayat CM Campaign) अभियान अथवा मोहीम सुरू करण्यात यावी, असे म्हटले आहे. कर्नाटकात राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेला लिंगायत समाज जवळपास 17 टक्के आहे. या समाजाचे अधिकांश लोक राज्याच्या उत्तर भागात आहेत. या समाजाकडे भाजप आपला मजबूत समर्थक वर्ग म्हणून पाहते.
भाजपला नुकसान होण्याचा अंदाज -
लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सावदी यांनी 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने भाजपला सोडून काँग्रेसचा हात धरला आहे. तेव्हापासून काँग्रेसने भाजपवर लिंगायत समाजावर ‘अन्याय’ करत असल्याचा आणि ‘लिंगायतविरोधी’ असल्याचा आरोप करायला सुरुवात केली आहे. यामुळे सत्ताधारी भाजपने आपला बालेकिल्ला वाचविण्यासाठी आणि पक्षाचे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
लिंगायत सीएम अभियान चालवणार भाजप? -
कर्नाटक भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी भाजपच्या लिंगायत नेत्यांची बैठक झाली. यावेळी, काँग्रेसच्या प्रचाराला शह देण्यासाठी भाजपने लिंगायत समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करायला हवे आणि सत्तेवर आल्यास पुढचा मुख्यमंत्री लिंगायत समाजाचाच असेल, असा प्रचार करायला हवा, असा विचार समोर आला.
काय म्हणाले मुख्यमंत्री बोम्मई -
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना यासंदर्भात पुष्टी केली. ते म्हणाले, कॉंग्रेसकडून काही मुद्द्यांवर पसरवल्या जात असलेल्या चुकीच्या माहितीला रोख ठोक उत्तर देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. काही सूचनाही आल्या आहेत (लिंगायत मुख्यमंत्र्यासंदर्भात). यावेळी धर्मेंद्र प्रधान देखील तेथे उपस्थित होते. ते म्हणाले, आमच्या भावना (लिंगायत-मुख्यमंत्र्यासंदर्भात) हायकमांडपर्यंत पोहोचवचील.