अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला निसटता विजय मिळवण्यात यश मिळाल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल याने इव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळे भाजपाचा विजय झाला, सनसनाटी आरोप केला आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मिळून इव्हीएमविरोधात आंदोलन छेडले पाहिजे असे आवाहन केले. तसेच गुजरातमध्ये यापुढेही पाटीदार आरक्षणाचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू करणार असल्याचा इशाराही त्याने दिला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना हार्दिक पटेलने भाजपाच्या विजयामध्ये इव्हीएमचा हात असल्याचा थेट आरोप केला. त्याने दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रामध्ये भाजपाने इव्हीएममध्ये घोळ केल्याचा दावा हार्दिक पटेलने केला. तसेच धोकेबाजी करून निवडणुक जिंकणाऱ्या भाजपाला शुभेच्छा अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.
- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला एकापाठोपाठ एक आरोप करून हैराण करणाऱ्या हार्दिक पटेलने मतदान आटोपल्यापासून इव्हीएमवरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली होती. अहमदाबादमधील एका कंपनीचे 140 इंजिनियर पाच हजार इव्हीएम हॅक करण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने ट्विटरवरून केला होता. काँग्रेसने याआधीच इव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने सातत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.