मुंबई - गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट होताच भाजपाच्या नरिमन पाँईट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी मुंबई भाजपाने सेलिब्रेशनसाठी खास सामना ढोल पथक मागवले होते. गुजरात निवडणुकीसाठी प्रचार सुरु असताना शिवसेनेने सामनामधून भाजपावर जोरदार टीका चालवली होती.
सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. भाजपा उमेदवारांना झटका देण्यासाठी शिवसेनेने गुजरातमध्ये आपले उमेदवारही उभे केले होते. अखेर भाजपाने आज सामनाचे ढोल वाजवून या सर्व अपमानाचा एकप्रकारे वचपाच काढला.
काँग्रेसचा पराभव झाला, भाजपाला यश मिळाले आणि बोंब मात्र कलानगरवाले मारायला लागले आहेत. अशी टीका भाजापाचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांनी शिवसेनेवर नाव न घेता केली. गुजरात आणि हिमचाल प्रदेशमधील विजयी आघाडीनंतर ते प्रतिक्रिया देत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी युवासेनेचे प्रमुख अदित्य ठाकरे यांची एका ट्विटवरुन फिरकी घेतली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमच्या विकासाच्या मॉडेलवर युवराजांनी ट्विट केलं होतं. त्यांना मी सांगतो...युवराज मॉडेलवर चर्चा करायचीय तर पेंग्विन आणि पार्टीच्या बाहेर या. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला आमचे विकासाचे मॉडेल सुरतमध्ये पहायला मिळाले. गुजरात आणि सुरतमध्ये तुम्ही जे उमेदवार उभे केले आहेत. त्या सर्व उमेदवारांची मते एकत्र केली तरी एकाही उमेदवाराचे डिपॉझिट वाचवू शकणार नाहीत.
त्यामुळे कलानगर वाल्यांची अवस्था अशी झाली आहे, ते स्वत:चे डिपॉझिट वाचवण्यासाठी किंवा अपयश लपवण्यासाठी दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला तरी आनंद व्यक्त करतात. आणि म्हणूनच काँग्रेसचा थोडीफार जास्त मते मिळाली म्हणून आनंतोस्तोव करत. पण ज्यांना आनंद होतोय, ते काँग्रेसप्रणेच रस्त्यावर येतील. असे म्हणत नाव न घेतला त्यांनी शिवसेनेवर टीका केली.