सुनील चावकेनवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील जबरदस्त विजयामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीद्वारे नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळवून देण्याची भाजपची सज्जता झाली आहे, तसेच या विजयानंतर रालोआतील घटक पक्षांसाठी आता भाजप म्हणेल तीच पूर्वदिशा ठरणार आहे. दुसरीकडे, मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या वाटाघाटीत काँग्रेसची क्षमता घटणार आहे. काँग्रेसचे वर्चस्व कमी झाल्यामुळे घटक पक्षांना हायसे वाटणार असले तरी काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे त्यांचीही चिंता वाढली आहे.
रालोआत आता भाजप म्हणेल तीच पूर्वदिशा
भाजपची ३४ घटक पक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीवरील (एनडीए) पकड आणखी घट्ट झाली आहे. एनडीएमध्ये भाजपपाठोपाठ महाराष्ट्रातील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन सर्वांत मोठ्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेला जागावाटपाचा फॉर्म्युला मान्य करावा लागणार आहे.
उत्तर भारताच्या हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्ये जिंकणाऱ्या भाजपसाठी कर्नाटकपाठोपाठ तेलंगणाच्या निकालाने दक्षिण भारताचे दार बंद केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात २६, तर तेलंगणमध्ये ४ जागा जिंकणाऱ्या भाजपला दक्षिणेतील राज्यांमध्ये जम बसविण्यासाठी नव्याने ताकद लावावी लागणार आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, आसाम आदी राज्यांतील मित्रपक्षांनाही भाजप देईल तेवढ्या जागा लढविण्यावर समाधान मानावे लागेल. तीन राज्यांतील विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा ही त्रिमूर्ती आणखी ताकदवान झाली असून, त्यांना पक्षांतर्गत आव्हान उरलेले नाही.
मध्य प्रदेश आणि राजस्थानया दोन्ही राज्यांमध्ये शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे शिंदे यांच्याऐवजी मुख्यमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्यांचा विचार करण्याची नामी संधी भाजपश्रेष्ठींना मिळाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आणखी एका राज्यात नेतृत्वबदल होणार असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटप वाटाघाटीत आता असेल वेगळे चित्र
भाजपशी थेट लढत असलेल्या राज्यांपैकी काँग्रेस मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सहज विजय मिळवेल आणि राजस्थानमध्येही जोरदार टक्कर देऊन स्पर्धेत राहील, असे चित्र रंगविले जात होते. त्यातच तेलंगणामध्ये काँग्रेसची लाट आल्यामुळे या निवडणुकांनंतर लोकसभेच्या ‘फायनल’साठी होणाऱ्या जागावाटपात काँग्रेसचे वर्चस्व वाढेल, अशी भीती ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना वाटत होती.
तीनपैकी दोन राज्यांमध्ये काँग्रेसचा विजय भाजपसाठी डोकेदुखी निर्माण करणारा ठरला असता. २०१८ च्या विधानसभा निवडणुका जिंकून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येऊनही काँग्रेस पक्ष २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत या राज्यांतील लोकसभेच्या ६५ पैकी ६२ जागा जिंकणाऱ्या भाजपला रोखू शकला नव्हता.
लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आसाम, छत्तीसगड, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल या राज्यांमधील १५२ मतदारसंघांमध्ये काँग्रेस-भाजप थेट लढत होईल. शिवाय महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब, दिल्ली या राज्यांतील २०२ मतदारसंघांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल, सपा, झामुमो, आप या मित्रपक्षांसोबत काँग्रेस उतरेल.
काँग्रेसने भाजपविरुद्ध सरळ लढत होत असलेल्या मतदारसंघांमध्ये आपली संपूर्ण ताकद लावून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करावा आणि ‘इंडिया’ आघाडीत जागावाटपात अनावश्यक समस्या निर्माण करू नये, असे मत आता ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे नेते व्यक्त करीत आहेत.
राहुल गांधी यांच्यासाठी कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि अशोक गहलोत या काँग्रेसमधील तीन स्वयंभू नेत्यांना मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या राजकारणातून बाजूला काढण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या तिन्ही नेत्यांच्या काँग्रेसमधील राजकीय कारकीर्दीला आता विराम मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.