नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. नवी दिल्लीतील एम्समध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. दरम्यान, अमित शहांना झालेल्या आजारावर टीका करताना काँग्रेसचे खासदार बी. के हरिप्रसाद यांनी वादग्रस्त विधान केले. बी. के हरिप्रसाद यांनी अमित शहांच्या आजारपणाची खिल्ली उडवत म्हटले की, ‘अमित शाह को सुअर जुकाम हो गया’. शिवाय, शहा यांना कर्नाटकच्या जनतेचा शाप लागला आहे, जर कर्नाटकच्या सत्तेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर अमित शहा यांना गंभीर आजार होईल'', असेही हरिप्रसाद यांनी म्हटले आहे.
हरिप्रसाद यांच्या वादग्रस्त विधानावर भाजपानं तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बी.के.हरिप्रसाद यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
''काँग्रेसने अमित शहा यांच्या आजाराबाबत ज्या प्रकारे वक्तव्य केलं आहे, ते निषेधार्ह आहे. काँग्रेस किती खालच्या पातळीला जाऊन टीका करू शकते, याचे हे उदाहरण आहे. स्वाइन फ्लू या आजारावर उपचार होऊ शकतात. मात्र काँग्रेस नेते मनोरुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार होणे कठीण आहे'', असे ट्विट करत पियुष गोयल यांनी शाब्दिक हल्ला केला आहे.
दरम्यान, अमित शहा यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खुद्द अमित शहा यांनी याबाबतचे ट्विट केले होते. पण आता त्यांची प्रकृती ठीक असून एक किंवा दोन दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती भाजपाच्या अनिल बलुनी यांनी दिली आहे.
शहा यांना स्वाइन फ्लूच्या उपचारांसाठी बुधवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. शहा यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना बलुनी यांनी सांगितले की, ''भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना एक ते दोन दिवसांमध्ये हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार.
हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एम्स संचालक रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांचे एक पथक अमित शहांवर उपचार करत आहे.