नवी दिल्ली: केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आंदोलन प्रभावित झाले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. (bku leader rakesh tikait will meet cm mamata banerjee over farmers protest)
राकेश टिकैत आणि ममता बॅनर्जी यांची भेटीमुळे एक वेगळेच राजकीय समीकरण तयार होऊ शकते, अशी चर्चा आहे. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत राकेश टिकैत यांनी प्रचारात सहभाग नोंदवला होता. तसेच भाजपविरोधी मतदान करण्याचे आग्रही आवाहन केले होते. इतकेच नव्हे, तर मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा दावाही केला होता.
PM मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; जाणून घ्या
ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी
पश्चिम बंगालमध्ये भाजपला जोरदार टक्कर देत ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. त्यामुळे मोदींविरोधात एक मजबूत पर्याय तयार झाला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वाराणसी येथून पंतप्रधान मोदींविरोधात ममता बॅनर्जी निवडणूक लढवू शकतात, असा अंदाजही वर्तवला जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये राकेश टिकैत यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
“होय, मी चुकलो, माझी भूमिका...”; PM मोदींवर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली
दरम्यान, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत थेट मोदी-शाहंना टक्कर दिल्यानंतर आता ममता बॅनर्जी TMC ला देशव्यापी करण्याच्या कामात लागल्या आहेत. यासंदर्भात पक्षातून TMC नाव बदलण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तर, नावासंदर्भात कामही सुरू झाले आहे. आता TMC सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवणार आहेत. यासाठी आतापासूनच तयारीही सुरू झाली आहे.