काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. या निकालानंतर आपल्याला धमकीचे एसएमएस आणि कॉल येत असल्याचे सलमानचे वकील महेश बोरा यांनी म्हटले आहे. सलमान खानचा खटला सोडण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचेही बोरा यांनी म्हटले. सलमान खानला गुरुवारी जोधपूरच्या न्यायालयाने पाच वर्ष तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. सलमानला जामीन मिळू न शकल्याने त्याला एक रात्र तुरुंगातच काढावी लागली. आजच्या सुनावणीसाठी न्यायालय परिसरात पोहोचल्यावर सलमानच्या वकिलांनी त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. 'काल मला धमक्यांचे एसएमएस आले. इंटरनेट कॉल करुनही धमक्या देण्यात आल्या. सलमानचा खटला सोडून देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे,' असे वकील महेश बोरा यांनी सांगितले. 'सलमानची बाजू मांडणे सोडून द्या. अन्यथा गोळ्या घालू,' अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे बोरा म्हणाले. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या सलमान जोधपूरच्या तुरुंगात आहे. सलमानला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असली, तरी या खटल्यातून अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम कोठारी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
'सलमानचा खटला सोडा, नाही तर गोळ्या घालू'; वकिलांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 11:30 AM