सहरसा - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. याठिकाणी बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली. या दुर्दैवी अपघातात आतापर्यंत २३७ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. परंतु हा देशातील पहिला मोठा अपघात नव्हे तर भारतात याआधीही अनेक भीषण रेल्वे अपघात झाले आहेत. ४२ वर्षापूर्वी बिहार रेल्वे अपघात, ज्याला देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात मानले जाते.
हा दिवस होता ६ जून १९८१..प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन मानसी-सहरसा रेल्वेमार्गावर घाट-धमारा स्टेशनजवळ बागामती नदीवर बनलेल्या पूलावर रुळावरून उलटून पडली. या ट्रेनमध्ये ९ डबे होते. ट्रेन रुळावरून घसरल्याने उफनती बागमती नदीत कोसळली. या दुर्घटनेत तब्बल ८०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून १९८१ ला मानसीपर्यंत ट्रेन नेहमीसारखी पुढे गेली. परंतु दुपारीच्या ३ च्यानंतर धमारा घाटाहून ट्रेन पुढे गेली. काही वेळाने वातावरण खराब झाले, मुसळधार पाऊस पडत होता. ट्रेन वेगाने जात होती. अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबला त्यामुळे पॅसेंजर ट्रेनचे ९ डबे बागामती नदीत पडले.
अनेक प्रवाशांचे मृतदेह कित्येक दिवस ट्रेनच्या बोगीमध्येच अडकले होते. या अपघातातील मृतांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार ३०० होती परंतु स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेत ८०० च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात म्हणून आठवले जाते. या दुर्घटनेबाबत अनेक गोष्टी त्यानंतर बाहेर आल्या. ट्रेन बागामती नदी ओलांडत असताना ट्रॅकवर अचानक गाय आणि म्हैशीचा झुंड आला त्यांना वाचवण्याच्या नादात ड्रायव्हरने ब्रेक दाबला.
तर काहींच्या मते, मुसळधार पावसामुळे ट्रेनमधील सर्व प्रवाशांनी दारे, खिडक्या बंद केले होते. त्यामुळे वेगवान वारे वाहताना त्याचा दबाव ट्रेनच्या डब्यावर पडला आणि डबे नदीत पडले. परंतु ड्रायव्हरने ब्रेक का दाबला याचा खुलासा आजपर्यंत झाला नाही. हा देशातील पहिला मोठा रेल्वे अपघात होता तर जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात होता. जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात श्रीलंकेत २००४ मध्ये झाला. जेव्हा सुनामीमुळे ओसियन क्वीन एक्सप्रेसचा अपघात झाला. ज्यात १७०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला.