मुंबई - देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले असल्याने खळबळ माजली आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी आजचा दिवस भारतीय न्यायाव्यवस्थेसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. आता प्रत्येक सामान्य व्यक्ती प्रत्येत निर्णयाकडे संशयाने पाहिल. प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल असंही ते बोलले आहेत. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याशी बातचीत करुन माहिती घेतली.
न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाचे प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून योग्यरित्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. जे चेलमेश्वर यांच्याबरोबर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली.
सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनंतर दुस-या क्रमांकावर असलेले जे चेलमेश्वर यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचं म्हटलं. पहिल्यांदाच न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागत असल्याचं ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाचं प्रशासन नीट काम करत नाही असं म्हणत त्यांनी थेट सरन्यायाधीशांच्या कामकाजावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील कारभारामुळे आम्ही वरिष्ठ न्यायमूर्ती दुःखी झालो आहोत. यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाहीत. याबाबत सरन्यायाधीशांसोबतही बोललो पण काही उपयोग झाला नाही असं ते म्हणाले. आम्ही आमचा आत्मा विकला आहे असं उद्या कोणी म्हणू नये, न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाही टिकणार नाही असं ते म्हणाले. या प्रकरणी सरन्यायाधिशांना दोन महिन्यांपूर्वी एक पत्र पाठवलं होतं असं सांगत चेलमेश्वर यांनी ते पत्र सार्वजनिक केलं.
गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसंच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे.