नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे, तर सत्ताधारी भाजपाने काळा पैसाविरोधी दिन म्हणून तो साजरा करण्याचे ठरवले आहे. या वर्षपूर्तीच्या आदल्या दिवशी मंगळवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवर पुन्हा कडाडून टीका केली, तर नोटाबंदीचे जोरदार समर्थन करताना, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयामुळे प्रचंड बेहिशेबी पैसा बँकांमध्ये जमा झाला, त्याला चेहरा मिळाला, असा दावा केला.जेटली म्हणतात...लोकांनी १५.४४ लाख कोटी रुपयांच्या बाद नोटा नावागावासकट सर्व माहिती देत बँकांमध्ये जमा केल्याने चलनातील बहुतांश पैशाला आता चेहरामोहरा मिळाला आहे. हा पैसा आता निनावी रहिलेला नाही. त्याआधी लोकांकडे खासगी व निनावी स्वरूपात असलेला हा पैसा आता अधिकृतपणे व्यवस्थेत आला आहे.डॉ. सिंग म्हणाले...हा दिवस भारतीय अर्थव्यवस्था व लोकशाही यादोन्हींच्या दृष्टीने ‘काळा दिवस’ ठरला आहे. अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. एवढेच नव्हे तर या निर्णयाने नेमके काय फायदे-तोटे झाले, याचे वास्तववादी मूल्यमापन करायला केंद्र सरकार अजूनही तयार नाही, हे त्याहीपेक्षा वाईट आहे.नोटाबंदीचे उद्दिष्ट सफलनवी दिल्ली : गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजीजे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता, ते साध्य झाले आहे. त्यामुळे हा दिवस अर्थव्यवस्थेच्या इतिहासात क्रांतिकारक म्हणून स्मरणात राहील, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी केला.जेटली यांनी लिहिले आहे की, याचे फायदे दिसत नसले तरी भारत पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, पारदर्शी व प्रामाणिक वित्तीय व्यवस्था असलेला देश झाला आहे. भावी पिढीला प्रामाणिक व्यवस्थेत आयुष्य घडविण्याची संधी मिळाल्याने ही पिढी नोव्हेंबर २०१६ मधील या आर्थिक घटनेकडे अभिमानाने पाहील.निर्णय ठरला पूर्ण घातकीअहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जबरदस्तीने लादलेले नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ हे निर्णय देशाच्या दृष्टीने पूर्णपणे विनाशकारी ठरले आहेत आणि त्यामुळे छोट्या उद्योग-व्यवसायांचे कंबरडे पार मोडून गेले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी येथे केली.नोटाबंदीच्या निर्णयाचा ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेस देशभर ‘काळा दिवस’ म्हणून पाळणार आहे. त्या अनुषंगाने येथील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारकात व्यापारी आणि उद्योजकांच्या एका मेळाव्यात स्वत: नामवंत अर्थतज्ज्ञ असलेले डॉ. सिंग म्हणाले की, नोटाबंदीमुळे देशाच्या आयातीत एक वर्षात २३ टक्के एवढी न भूतो अशी वाढ झाली आणि यात चीनकडून आयातीतील वाढ मोठी होती.रोख चलनाचा वापर कमी करणे हा नोटाबंदीचा प्रमुख उद्देश होता. रोख रकमा काळ्या पैशासाठी पोषक असतात. काळ्या पैशास आळा घालण्यासाठी रोख चलनाचा वापर कमी करणे गरजेचे होते.- अरुण जेटली‘बुलेट ट्रेन’बद्दल शंका घेणाºयांना देशद्रोही ठरवायचे. नोटाबंदी व ‘जीएसटी’वर टीका केली की त्याची करबुडवे म्हणून हेटाळणी करायची ही सत्ताधारी पक्षाची वृत्ती लोकशाहीला मारक आहे.- डॉ. मनमोहन सिंग
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला काँग्रेस-भाजपा आमनेसामने, विरोधक आज पाळणार काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 5:48 AM