बंगळुरू : लहानपणी खेळताना मुलं काहीतरी पराक्रम करून ठेवतात आणि आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागतो. असाच एक प्रकार कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात राहणाऱ्या रेणुका नावाच्या १२ वर्षांच्या मुलीबाबत घडला आहे. गेली नऊ वर्षे तिला खोकल्याचा प्रचंड त्रास होता होता. पण त्याचं निदान डॉक्टरांना होत नव्हतं. अनेक चाचण्या झाल्या, औषधं झाली, पण खोकला थांबेना आणि त्याचं कारण कळेना. रेणुकाच्या थुंकीतूनही दुर्गंधी यायची. अनेक डॉक्टर झाले, रुग्णालयांचे हेलपाटे झाले. पण कोणत्याच औषधाचा फायदा होईना. एक्सरेमध्ये एक काळा ठिपका दिसला. एन्डोस्कोपीद्वारे तो दूर करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. पण तो निघाला नाही. अखेर डॉक्टरांनी तो डाग कसला आहे, हे शोधण्यासाठी शस्त्रक्रिया केली आणि त्यात सापडलं पेनाचं टोपण. मंगळवारी ते फुप्फुसातून बाहेर काढण्यात आलं आणि लगेचच रेणुकाला आराम वाटू लागला. ती तीन वर्षांची असताना तिनं पेन गिळलं होतं. बंगळुरूच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ चेस्ट डिसीजच्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. रेणुकाचे आई-वडील मजुरी करतात. ती बरी झाल्याने त्यांचीही चिंता आता थांबली आहे.
फुप्फुसातला काळा ठिपका
By admin | Published: April 02, 2017 12:52 AM