मुजफ्फरपूर : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदू ज्वरामुळे 108 मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तब्बल 18 दिवसांनी इस्पितळात भेट देण्यास पोहोचल्याने बाहेरील नागरिकांनी जोरदार विरोध केला. तसेच काळे झेंडे दाखवत चले जावचे नारे दिले. तर मृत मुलांच्या नातेवाईकांनी नितीश कुमार मुर्दाबादचे नारे दिले.
हॉस्पिटलमध्ये मेंदुज्वराने आजारी मुलांवर नीट उपचार करण्यात येत नाहीत. रोज मुलांचा मृत्यू होत आहे. नितीश कुमार यांना आता जाग आली आहे. त्यांनी परत जावे, अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या एका नातेवाईकाने दिली आहे. नितीशकुमार 18 दिवस उलटले तरीही मुजफ्फरपूरच्या दौऱ्यावर न आल्याने यापूर्वी विरोधकांनीही त्यांना लक्ष्य केले होते.
मेंदू ज्वराने मुलांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली तरीही मुख्यमंत्री नितीशकुमार न आल्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. यामुळे मुजफ्फरपूरमध्ये पोलिसांनी सुरक्षा वाढविली होती. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जास्त त्रास सहन करावा लागला. मुलांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुळे देशभरात हाहाकार माजला आहे.
बिहारमध्ये भीषण उष्माघातानं कहर केला असून, आतापर्यंत एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात 100हून अधिक मुलं बळी पडली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून 183 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात अनेक पेशंटवर उपचार सुरू आहेत. पाटण्यासह राज्यातील प्रमुख शहरांचं तापमान 45 डिग्रीच्या आसपास आहे. बिहार सरकारनं 22 जूनपर्यंत सर्व सरकारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
उष्माघातामुळे प्रशासनानं 144 कलम लागू केलं आहे. बिहारमधल्या होत असलेल्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि मंगल पाडेय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्वच सरकारी आणि गैर सरकारी निर्माणाधीन का, मनरेगाअंतर्गत मजुरी आणि सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची मुजफ्फपूरमधील श्रीकृष्णा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाची पाहणी केली होती.