नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता आणखी एका फंगसचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा (Black Fungus) मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ब्लॅक फंगसला काही राज्यांमध्ये महामारी घोषित करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत माहिती दिली आहे. 24 मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण 18 राज्यांमध्ये म्युकोरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण 5 हजार 424 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच गुजरातमध्ये 2 हजार 165, महाराष्ट्रात 1 हजार 188, उत्तर प्रदेशात 663, मध्य प्रदेशात 519, हरियाणात 339 आणि आंध्र प्रदेशात 248 म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत.
देशात आढळलेल्या म्युकोरमायकोसिसच्या 5 हजार 424 रुग्णांपैकी 4 हजार 556 जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर 55 टक्के रुग्णांना पहिल्यापासूनच मधुमेहाची समस्या होती. 'ब्लॅक फंगस' म्हणजेच "म्युकोरमायकोसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका डॉक्टरने यावर प्रभावी आणि अगदी किफायशीर असा उपचार केल्याचा दावा केला आहे. या डॉक्टरने 100 वर्षांपेक्षा जास्त जुना फॉर्म्युला सांगितला आहे. हा उपाय सर्वात स्वस्त आणि अचूक असल्याचं या डॉक्टरने सांगितलं आहे. जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी हा दावा केला आहे.
Black Fungus वर प्रभावी ठरतोय तब्बल 100 वर्षे जुना असलेला 'हा' खास फॉर्म्युला; डॉक्टरचा मोठा दावा
डॉ. अमरेंद्र पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना या उपचारामार्फत ब्लॅक फंगससारख्या भयानक आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा उपाय म्हणजे मिथलीन ब्लू. डॉ. पांडे यांच्या मते हे औषध अँटीफंगलचं काम करतं आणि अगदी सहजपणे उपलब्ध होतं. पण या औषधाचा वापर करताना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णांच्या शरीरात हे औषध पोहोचवणारी व्हेंटिलेटर ट्युब आणि ऑक्सिजन ट्यूब वारंवार स्वच्छ करत राहायला हवी. यामळे फंगस निर्माण होत नाही आणि रुग्ण पूर्णपणे सुरक्षित राहतो असं पांडे यांनी म्हटलं आहे.