नवी दिल्ली : काळा पैसा विदेशात साठवून ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा ठोठावण्याची तरतूद असलेले काळा पैसा विधेयक अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी सादर केल्यानंतर लोकसभेने ध्वनीमताने मंजुरी दिली.भ्रष्टाचाराची माहिती उघड करणाऱ्या जागल्यांना (व्हिसलब्लोअर) संरक्षण देणाऱ्या २०११ च्या कायद्यात सुधारणा करण्यासंबंधी अन्य एक विधेयकही या सभागृहात सादर करण्यात आले. विदेशातील संपत्तीची माहिती दडवून ठेवणाऱ्यांना १२० टक्के दंड आणि कर ठोठावण्यासह गुन्हेगारी खटला भरण्याची तरतूद काळा पैसा विधेयकात आहे. विदेशातील अघोषित संपत्ती किंवा उत्पन्नाला अटकाव घालण्यासाठी आणले गेलेले हे विधेयक मैलाचा दगड ठरेल, अशी ग्वाही जेटलींनी दिली. या कायद्याबाबत निर्दोष विद्यार्थी, व्यावसायिक किंवा प्रवाशांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. हे विधेयक पारित झाल्यानंतर संबंधितांना विदेशात गोळा केलेल्या संपत्तीची माहिती दोन महिन्यांत देणे बंधनकारक राहील. सहा महिन्यांत ३० टक्के कर आणि ३० टक्के दंडाची तरतूद असेल. हा कालावधी संपल्यानंतर दंडाची रक्कम ९० टक्के केली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काळा पैसा विधेयक लोकसभेत मंजूर
By admin | Published: May 11, 2015 11:45 PM