अहमदाबाद : केनियामध्ये राहणारे गुजराती नागरिक कच्छमधील बँकांमधून करोडो रुपये काढत असल्याचे समोर आले आहे. तसेच मागील काही काळात शेकडो करोड रुपये केनियामध्ये नेण्यात आले आहेत. भारताच्या काळ्या पैशांविरोधातील कारवाईमुळे नाही तर केनिया सरकारतच्या भीतीने हे गुजराती नागरिक असे करत आहेत.
एप्रिल ते जून या काळात कच्छमधील बँकांमधून 430 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. यामुळे अनिवासी गुजराती नागिरकांचे पैसे कमी होऊन 11,872 कोटींवर आले आहेत. या आधीच्या तिमाहीमध्ये या बँकांमध्ये 12,302 कोटी रुपये होते. हे आकडे राज्यस्तरिय बँकर्स समितीने जारी केले आहेत.
मात्र, बँक अधिकाऱ्यांनुसार डिसेंबर 2017 पासून जवळपास 1 हजार कोटी रुपये काढण्यात आले आहेत. सर्वाधिक पैसा भूज आणि मांडवी तालुक्यातून काढण्य़ात आला आहे. या भागातील सर्वाधिक अनिवासी गुजराती केनियामध्ये राहतात.
पैसे का काढले?केनिया सरकारने नुकताच नियम केला आहे की, सर्व करदात्यांनी परदेशातील बँकांमध्ये जमा असलेल्या पैशांबाबत सरकारला माहिती द्यावी. यासाठी अवधी देण्यात आला असून यानंतर उत्पन्न घोषित केल्यास त्यावर व्याज आणि दंड आकारला जाणार आहे. पहिल्यांदा हा अवधी 30 जून 2018 पर्यंत देण्यात आला होता, मात्र ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.