नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची प्रचाराची रणधुमाळी संपेपर्यंत निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत ८,८८९ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात रोख रक्कम, मौल्यवान धातू आणि अमली पदार्थांचा समावेश आहे. जप्तीचा हा आकडा लवकरच नऊ हजार कोटींच्या वर जाऊ शकतो.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी विविध यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहेत. या यंत्रणांनी आतापर्यंत ८८८९.७४ कोटी रुपयांची रोकड आणि अवैध सामग्री जप्त केली आहे. १ मार्चपासून रोख रक्कम, मौल्यवान धातू व अमली पदार्थ याशिवाय मतदारांना वाटपासाठी आणलेल्या विविध वस्तू आणि मद्याचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूक अधिकाधिक स्वच्छ वातावरणात पार पडावी यासाठी अमली पदार्थांच्या जप्तीवर निवडणूक आयोगाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी नोडल संस्थांना संबाेधित करताना सांगितले की, एकूण जप्तीत अमली पदार्थांचे प्रमाण ४५ टक्के आहे. ३,९५८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत.
सर्वाधिक जप्ती कुठे?तेलंगणा ११४ काेटीकर्नाटक ९२ काेटीदिल्ली-एनसीआर ९० काेटीआंध्र प्रदेश ८५ काेटीमहाराष्ट्र ७५ काेटीझारखंड ४५ काेटीराजस्थान ४२ काेटी