मोदींच्या घरगृहस्थीत नाक खुपसणे भोवले : पंतप्रधानांच्या विभक्त पत्नीची डीडी गिरनारने दिली बातमी; अंदमानला केली बदलीनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विभक्त पत्नी जसोदाबेन यांच्याबद्दलची बातमी प्र्रसारित करणे दूरदर्शनच्या गुजरातेतील एका सहायक संचालकास चांगलेच महागात पडले. या अधिकाऱ्याची अहमदाबादेतून थेट अंदमानला बदली करण्यात आली आहे.दूरदर्शनच्या गुजराती वाहिनीवर हे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या अधिकाऱ्याचे नाव व्ही.एम. वनोल असे असून ते सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार डीडी गिरनारने गेल्या १ जानेवारीला दोन मिनिटांपेक्षाही कमी कालावधीचा हा वृत्तांत प्रसारित केला होता. जसोदाबेन यांनी पंतप्रधानांची पत्नी या नात्याने त्यांना मिळालेल्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज दाखल केला होता आणि प्रसारमाध्यमांनी त्याला व्यापक प्रसिद्धीही दिली होती. हे वृत्तही याच विषयाशी संबंधित होते. त्यानंतर तडकाफडकी जानेवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात वनोल यांची अंदमानला बदली करण्यात आली. या बदलीसंदर्भात माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे विचारणा केली असता कुठलेही ठोस उत्तर मिळू शकले नाही, तर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नामोल्लेख न करण्याच्या अटीवर सांगितले की, हा एक संपादकीय आणि प्रशासकीय निर्णय असून कुठल्याही ठराविक घटनेचा याच्याशी संबंध नाही. दरम्यान, अंदमानच्या पोर्टब्लेअर स्टेशनला आपली बदली झाली असल्याच्या वृत्ताला वनोल यांनी दुजोरा दिला आहे; परंतु यामागील कारणांचा ऊहापोह करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. दुसरीकडे अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथील दूरदर्शन अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार वृत्त प्रसारित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माहिती व प्रसारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहमदाबाद दूरदर्शन केंद्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना स्पष्टीकरण मागितले होते. एवढेच नाही तर केंद्राचे सहसंचालक व वनोल यांच्यासह तीन सहायक संचालकांची खरडपट्टीही काढण्यात आली होती. मंत्रालयातील अधिकारी मात्र ही एक नियमित बैठक असल्याचा दावा करीत आहेत. वनोल त्यादिवशी गुजरातसंबंधित वृत्त संकलनाचे प्रभारी होते. जसोदाबेन यांची बातमी महत्त्वाची असल्याने यासंदर्भातील छोटेसे वृत्त प्रसारित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता, अशी माहिती अहमदाबाद कें द्राच्या कर्मचाऱ्याने दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)संपुआ सरकारच्या कार्यकाळात डीडी गिरनारने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक योजनांची प्रसिद्धी देणाऱ्या जाहिराती प्रसारित करणे बंद केले होते; परंतु १६ मे २०१४ रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच परिस्थिती पालटली. आम्हाला आपली भूमिका बदलण्यास सांगण्यात आले. दूरदर्शनवर केंद्राचेच संपूर्ण नियंत्रण असून त्याला कुठलीही स्वायत्तता नाही, अशी खंत दूरदर्शनच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
दूरदर्शनच्या अधिकाऱ्यास ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा
By admin | Published: January 31, 2015 11:56 PM