जोधपूर - काळवीट शिकार प्रकरणात सुनावण्यात आलेली शिक्षा रद्द व्हावी, यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं दाखल केलेल्या याचिकावर सोमवारी (7 मे) सुनावणी झाली. या सुनावणीसाठी सलमान खाननं जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजेरीदेखील लावली. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी 17 जुलैला होणार आहे.
दोन काळविटांची 20 वर्षांपूर्वी शिकार केल्याप्रकरणात जामीन मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सोमवारी पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानच्या बहिणी अलविरा आणि अर्पितादेखील त्याच्यासोबत कोर्टात आल्या होत्या. 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने 5 एप्रिलला सलमान खानला दोषी ठरवत, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय, न्यायालयाच्या संमतीखेरीज त्याला देशाबाहेरदेखील जाता येणार नाही, असाही आदेश दिला. ''हम साथ-साथ है!'', सिनेमाच्या शुटिंगदरम्यानची ही घटना आहे.
दरम्यान, सलमानला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी त्याला जोधपूर कोर्टाकडून जामीनदेखील मंजूर करण्यात आला होता. सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी 50 हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका व प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या दोन जामिनांवर सलमानच्या सुटकेचा आदेश दिला. यानंतर 7 एप्रिलला दुपारीच जामिनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सलमान सायंकाळी तुरुंगातून बाहेर पडला. न्यायालयाने सलमानला जामीन देण्याखेरीज अपिलावर सुनावणी होईपर्यंत, त्याच्या शिक्षेलाही स्थगिती दिली. दरम्यान, प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
(साक्ष बदलण्यासाठी सलमानकडून पैशांचे आमिष, भाजप नेत्याचा आरोप)
काय आहे नेमके प्रकरण?वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटिंगसाठी सलमान खान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. 1-2 ऑक्टोबर 1998च्या मध्यरात्री सर्व जण एका जिप्सी कारमध्ये होते आणि जिप्सी सलमान चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमानने गोळ्या झाडून त्यांपैकी दोघांना ठार मारले, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या प्रकरणात सलमानविरोधात पुरावेदेखील आहेत, असे सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते.